गणपतीपुळेसह आरे-वारे येथे धोका पत्करून पर्यटक उतरताहेत समुद्रात

रत्नागिरी : जिल्ह्यात गेले दोन दिवस सरींचा पाऊस सुरू आहे. त्याचा आनंद घेण्यासाठी मुंबई-पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक गणपतीपुळे किनारी दाखल झाले आहेत. शनिवार, रविवारी जोडून सुट्या असल्यामुळे किनाऱ्यावर वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गर्दी आहे. सध्या समुद्र खवळलेला असल्याने पाण्यात पोहण्यासाठी उतरणाऱ्यांवर अंकुश ठेवताना जीवरक्षकांसह स्थानिक व्यापाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. गणपतीपुळेसह आरे-वारे, नेवरे किनारी पर्यटकांचा अधिक राबता असून पर्यटक बिनधास्तपणे समुद्राच्या लाटांवर स्वार होण्यासाठी सरसावत आहेत.

शाळा, महाविद्यालये सुरू झाली असली तरीही शनिवार, रविवारी जोडून येणाऱ्या सुटीला पर्यटकांचा कोकणातील राबता कमी झालेला नाही. पावसाचा आनंद घेण्यासाठी शनिवारी सकाळपासूनच पर्यटक गणपतीपुळे, आरे-वारे, गुहागर, दापोलीतील किनाऱ्यांच्या ठिकाणी दाखल झाले होते. सायंकाळी आरे-वारे येथून मावळतीचा सूर्य पाहण्यासाठी पर्यटकांची प्रचंड गदीं होती. कोकणात मुसळधार पावसाचा जोर ओसरला असून ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला आहे. दिवसातून एखादी सर पडून जात असल्याने वातावरणही पर्यटनाला पोषक असेच आहे. त्याचा आनंद समुद्रकिनारी घेण्यासाठी परजिल्ह्यातील पर्यटक येत आहेत. यामध्ये सर्वाधिक नवविवाहित जोडपी, तरुण-तरुणी यांचा समावेश आहे. किनाऱ्यावर येणाऱ्या लाटांचा आनंद घेण्यासाठी युवा पिढी पाण्यात उतरताना दिसत आहे. भरतीच्यावेळी पाण्यात अचानक भोवरा तयार होत असल्याने त्या पर्यटकांचा बिनधास्तपणा जीवावर बेतणाराही ठरत होता. किनाऱ्यावरील काही स्थानिक व्यावसायिक, जीवरक्षक त्यांना याची कल्पना देतात, परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते.

आरे-वारे येथे शनिवारी (ताः २१सायंकाळी दोन पर्यटक खाडीच्या मुखाशी पोहत होते. हलका वारा आणि भरती यामुळे खाडीच्याजवळ लाटांचा जोरही वाढलेला होता तिथे भोवरा तयार होत असल्याने त्या दोन पर्यटकांना पोलिसपाटील आदेश कदम यांनी सतर्क केले. किनाऱ्यावरून शिट्या वाजवून धोक्याची सूचना पाटील वारंवार देत असतात. तरीही पर्यटक पुन्हा त्याच ठिकाणी जात असल्याचे दिसत आहे. सायंकाळी किनाऱ्यावरील पर्यटकांची गर्दी वाहत असल्याने सुटीच्या दिवशी पोलिसांची गस्त सुरू करावी, अशी मागणी केली जात आहे. तसे केले तर धोका पत्करून समुद्रात उतरणाऱ्यांवर अंकुश बसेल. अन्यथा दुर्घटना झालेल्या घटनांचा आकडा आणखी वाढेल अशी भीतीही व्यक्त केली

सुरक्षेचा भार जीवरक्षकांवर
पावसाळा सुरू झाल्यानंतर जलक्रीडा बंद ठेवल्या जातात. जेट स्की, समुद्र किनाऱ्यावर बोटिंग यांसह विविध खेळ सुरू असल्याने एखादा पर्यटक पाण्यात बुडू लागला तर त्याला संरक्षण मिळत होते. आता वॉटरस्पोर्टस् बंद असल्याने जीवरक्षकांवरील भार अधिकवा आहे. सध्या गणपतीपुळे किनाऱ्यावर दोन जीवरक्षक असल्याची माहिती मिळाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 PM 23/Jun/2025