आंबोली : मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे आंबोलीतील वर्षा पर्यटन हंगाम लवकर सुरू झाला. जून महिन्याच्या तिसऱ्याच आठवड्यांत आंबोलीतील मुख्य धबधब्यासह इतर धबधबेही पूर्ण क्षमतेने वाहू लागले आहेत.
त्यामुळे आंबोलीकडे येणाऱ्या पर्यटकांचा ओढा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
रविवारी हजारोंच्या संख्येने पर्यटकांनी आंबोलीमध्ये हजेरी लावली होती. यात कोल्हापूर, सातारा, सांगली, बेळगाव, धारवाड, गोवा तसेच सिंधुदुर्गातील पर्यटक मोठ्या संख्येने होते. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे आंबोली येथे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
मुख्य धबधब्यासह इतर धबधब्यांवरही मोठ्या संख्येने पर्यटकांनी गर्दी केली होती. यावेळी या पर्यटकांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांचीही मोठी कुमक हजर होती. हिरण्यकेशी नदीचा उगम कावळेशेत दरी महादेव गड पॉइंट या ठिकाणीही पर्यटकांनी गर्दी केली होती.
कोणताही अनुचित प्रकार न होता रविवारी मोठ्या संख्येने पर्यटकांनी आंबोलीतील वर्षा पर्यटनाचा आनंद लुटला. मोठ्या संख्येने आलेल्या पर्यटकांमुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. परंतु ती वाहतूक पोलिसांनी कार्यरत असल्यामुळे ती वाहतूक कोंडी सुटली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:39 23-06-2025














