महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राहुल गांधींना भारताच्या आर्थिक प्रगतीबद्दल आणि मेक इन इंडिया या उपक्रमाबद्दल काहीच माहिती नसून त्यांना गृहपाठाची गरज आहे, असे फडणवीस म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना फडणवीस म्हणाले की, “राहुल गांधींना मेक इन इंडिया माहित नाही, त्यांना आपल्या देशात कशाचे उत्पादन होते, हे माहिती नाही.त्यांना कदाचित हे देखील माहिती नसेल की, काँग्रेस सरकारच्या काळात भारताची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावर होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणले. मोदींनी गेल्या १० वर्षात भारताला चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवली. पुढील दोन वर्षात भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. राहुल गांधींना गृहपाठ करण्याची गरज आहे.”
मेक इन इंडियाबाबत राहुल गांधी काय म्हणाले?
राहुल गांधींनी मेक इन इंडियाबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती, ज्यात त्यांनी असे म्हटले होते की, “मेक इन इंडियाच्या माध्यमातून कारखाने अधिक उत्पादन करतील, रोजगार वाढेल, असे सांगण्यात आले. मग आज उत्पादन इतक्या निचांकी पातळीवर का पोहोचले? बेरोजगारी वाढत आहे. चीनमधून होणारी आयात दुप्पटीने का वाढली? २०१४ पासून देशाच्या एकूण जीडीपीतून उत्पादनाचा वाटा घसरून १४ टक्क्यांवर आला. फक्त घोषणा करून उपयोग नाही, भारताला आता खरी सुधारणा आणि मजबूत आर्थिक पाठबळ हवे आहे, जे लाखो लघु व मध्यम उद्योगांना सक्षम बनवेल.”
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:57 23-06-2025














