चिपळूण, ता. २३: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने (ठाकरे गट) तयारी सुरू केली आहे. मात्र, या तयारीदरम्यान पक्षाचे दोन प्रमुख नेते, माजी खासदार विनायक राऊत आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव, यांच्या स्वतंत्र बैठका होत असल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. दोन्ही नेत्यांनी चिपळूणमधूनच संघटना बांधणीला सुरुवात केली असली तरी, ते एकत्र येणे टाळत असल्याचे चित्र आहे.
जवळपास तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रशासकीय स्तरावर तयारी सुरू झाली आहे. चिपळूण पालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, दोन्ही शिवसेना गट आणि भाजप यांच्यात तीव्र स्पर्धा अपेक्षित आहे. तसेच, जिल्हा परिषदेच्या ९ आणि पंचायत समितीच्या १८ जागांसाठीही महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरस पाहायला मिळेल.
राऊत-जाधव एकत्र येणे टाळतात का?
काही दिवसांपूर्वी चिपळूणमध्ये शिवसेनेच्या (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला राऊत आणि जाधव एकत्र येतील अशी अपेक्षा होती, परंतु राऊत यांचा दौरा रद्द झाला. त्यानंतर जाधव यांनी चिपळूणमधील सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेला पराभव पत्करावा लागल्यानंतरही राऊत यांचा मतदारसंघात संपर्क कायम आहे. ते मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. दुसरीकडे, कोकणातील शिवसेनेचे नेते आणि ठाकरे गटाचे एकमेव आमदार भास्कर जाधव यांनी प्रथम आपल्या मतदारसंघाच्या बांधणीला सुरुवात केली आहे. रविवारी त्यांनी चिपळूणमधील शिवसेनेच्या शाखाप्रमुखांचा मेळावा घेतला, तर राऊत यांनी तत्पूर्वी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शासकीय विश्रामगृहावर घेतली होती. जाधवांचे शिबिर बांदल स्कूलच्या सभागृहात झाले, तर राऊत यांची बैठक शासकीय विश्रामगृहावर पार पडली.
विनायक राऊत म्हणतात…
“भास्कर जाधव पक्षाचे नेते आहेत. त्यांनी मतदारसंघात बांधणीला सुरुवात केली आहे. आगामी काळात आम्ही दोघे मिळून रत्नागिरी जिल्ह्यात प्रचारासाठी सभा घेऊ. सध्या प्राथमिक स्तरावर चाचपणी सुरू आहे. शिवसेनेला पुन्हा एकदा वैभव मिळवून देणे, हे आमचे दोघांचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे दोघेही पक्षासाठीच काम करतोय,” असे माजी खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
महाविकास आघाडी होणार की नाही, हे अद्याप निश्चित नसले तरी, ठाकरे गटाच्या शिवसेनेने मात्र निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. दोन्ही नेते स्वतंत्रपणे काम करत असले तरी, आगामी काळात हे दोघे एकत्र येऊन पक्षासाठी प्रचार करतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 24-06-2025














