चिपळूण : शहरातील मच्छी-मटणमार्केटसह भाजीमंडई इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल पालिकेला प्राप्त झाला आहे. त्यानुसार दोन्ही इमारती मजबूत असून, त्यांची केवळ तात्पुरती दुरुस्ती करण्याच्या सूचना अहवालात देण्यात आल्या आहेत, त्यानुसार मटण मच्छीमार्केटच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून, त्यानंतर लिलाव प्रक्रिया राबवली जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल भोसले यांनी दिली.
चिपळूण पालिकेने २० वर्षांपूर्वी मच्छी-मटण व भाजीमंडईच्या इमारती पाहून नवीन बांधल्या; मात्र त्यानंतर त्यात राजकारण शिरल्याने हे दोन्ही प्रकल्प आजतागायत सर्व सोयीसुविधांनीयुक्त पूर्ण होऊ शकलेले नाहीत, तरीही त्यामधील गाळ्यांचा अनेकदा लिलाव करण्याचा प्रयत्न पालिकेने केला मात्र भाडयाने देण्याची वर्षे, मोठी नापरतावा अनामत व भाड्याची आवाक्याबाहेरील रक्कम यामुळे सुविधा नसलेले गाले घेण्यापेक्षा बाजारात नवे गाळे घेऊन व्यवसाय केलेला बरा, अशी भूमिका व्यावसायिकांनी घेतल्याने हे दोन्ही प्रकल्प आजही पडून आहेत.
मात्र मुख्याधिकारी भोसले यांनी पालिकेचे होणारे आर्थिक नुकसान लक्षात घेता या प्रकल्पांचा लिलाव करण्याचे ठरवले. त्यांनी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्य समितीकडून भाजीमंडईतील ६२ गाळे, २१ ओटे, मच्छी मटणमार्केटमधील ४३ गाळे, पवन तलाव मैदान परिसरातील इमारतीतील ७ गाळे फेरमूल्यांकन करून घेतले असून त्यानुसार आता हे सर्व प्रकल्प ३० वर्षासाठी भाडेतत्वावर देण्यास मंजूरी मिळाली आहे तसेच परतावा अनामत रक्कम, भाडेही कमी करून घेतली आहे.
त्यानंतर व्यावसायिकांच्या बैठका घेतल्या त्यात स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेण्यासह दुरुस्ती करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली होती. त्यानुसार सांगली महाविद्यालयाकडून स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेण्यात आले. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, दोन्ही प्रकल्पाच्या इमारती मजबूत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मात्र प्लास्टर, रंग व शेटर लावणाची कामे सुचवण्यात आहेत. त्यानुसार मटण-मच्छीमार्केटच्या किरकोळ दुरुस्तीच्या कामाला सुरवात होणार आहे. ही दुरुस्ती पूर्ण होताच लिलाव प्रक्रिया राबवली जाणार असून, त्यानंतर आवश्यक दुरुस्तीला सुरवात करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी भोसले यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 24/Jun/2025














