रत्नागिरी, ता. २३ जून, २०२५ : रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगाव येथे मालमत्तेच्या वादातून एका व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आणि सरकारी मोजणीचे खांब (खुणा) नष्ट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिरगाव येथील रवींद्र वैजनाथ दामले यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ नुसार विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुष्कर माधव दामले (वय ५७, सध्या रा. डोंबिवली (पूर्व), मूळ रा. शिरगाव) यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २२ जून २०२५ रोजी सकाळी ७:०४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी रवींद्र दामले यांनी फिर्यादीला पाहताच, “ग्रामपंचायतीने काढलेले गेट मी परत लावले आहे, तुला माहित आहे कलेक्टर माझा माणूस आहे. तू आता इथून जिवंत कसा जातोस ते मी पाहतो,” अशी धमकी दिली.
याशिवाय, मा. न्यायालयाच्या आदेशानुसार संपूर्ण मिळकत आणि फिर्यादी यांच्या कुटुंबाच्या ताब्यात असलेल्या सर्वे नं ६२, हिस्सा नं २-अ (२-१) या मिळकतीमध्ये आरोपीने बेकायदेशीरपणे लोखंडी गेट लावले आणि दगडी भिंत (गडगा) बांधली. एवढेच नव्हे, तर शिरगाव ग्रामपंचायतीच्या रजिस्टरमध्ये नोंद असलेल्या रस्त्यावरही लोखंडी गेट टाकून फिर्यादीच्या चारचाकी वाहनाचा रस्ता अडवला. महत्त्वाचे म्हणजे, आरोपीने सरकारी मोजणीच्या खाणाखुणाही नष्ट केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १२६ (२), २३८, ३२९ (३) आणि ३५१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 24-06-2025














