राजापूर शहरातील रस्त्यावरील खड्डे तत्काळ भरावेत अन्यथा ठाकरे शिवसेनेचा रास्ता रोकोचा इशारा

राजापूर : शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. शहरातील मुख्य रस्ता जकात नाका ते जवाहर चौक या सुमारे पावणेदोन कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या रस्त्यातील खड्डे वाचवत वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावरील खड्डे तत्काळ भरावेत अन्यथा त्या विरोधात रास्ता रोको करण्याचा इशारा ठाकरे शिवसेनेने दिला आहे.

शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्यांबाबत ठाकरे शिवसेनेने पालिकेला निवेदन दिले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख कमलाकर कदम, शहरप्रमुख संजय पवार, माजी नगरसेवक विनय गुरव, अनिल कुडाळी, विभागप्रमुख संतोष हातणकर, वीणा विचारे प्रतीक्षा मांजरेकर, संगीता चव्हाण, मोनाक्षी गुरव, प्राची शिर्के आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

शहरातील जकात नाका ते जवाहर चौक या वर्दळीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामध्ये या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. खड्डेमय रस्त्यातून वाहने चालवताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेतर्फे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. रस्त्यावरील खड्डे न भरल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ठाकरे शिवसेनेने दिला आहे.

सफाई केली होती; तर पाणी रस्त्यावर का?
पावसाळ्यापूर्वी शहरातील अनेक भागांतील गटारांची साफसफाई केल्याची माहिती नगरपालिकेतर्फे देण्यात आली. गटारांची साफसफाई करण्यात आली असेल, तर पावसामध्ये गटाराचे पाणी रस्त्यावर येते कसे, असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेतर्फे उपस्थित करत त्याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याचे सूचित केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 24/Jun/2025