लांजा : कोत्रेवाडी डम्पिंग ग्राऊंड प्रकल्पाविरोधात ८ जुलैला उपोषण

लांजा : लांजा नगरपंचायतीच्या वतीने नियमबाह्य पद्धतीने व जोर जबरदस्तीने कोत्रेवाडी येथे लोकस्तीलगत डम्पिंग ग्राउंड प्रकल्प राबविण्यात येत असल्याचा आरोप करत या प्रकल्पाविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ग्रामस्थांसह ८ जुलै रोजी या डंपिंग ग्राउंड प्रकल्पाविरोधात एकदिवशीय लाक्षणिक उपोषण छेडण्याचा पवित्रा घेतला आहे.

या उपोषणाबाबतचे निवेदन नुकतेच लांजा तहसीलदार व लांजा नगरपंचायत यांना देण्यात आले. शिवसेना व स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील कोत्रेवाडी येथे वस्तीलगत घनकचरा प्रकल्प राबवला जात आहे. यासाठी सर्व नियमांची पायमल्ली करत जोर जबरदस्तीने हा प्रकल्प लादला जाऊन लोकवस्तीचे जनजीवन उद्ध्वस्त करण्याचा एक प्रकारे घाट घातला गेला आहे. तत्पूर्वी कोत्रेवाडी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी, प्रांताधिकारी, लांजा तहसीलदार, लांजा नगरपंचायत यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी करून आपल्या न्याय हक्कासाठी विनंती केली आहे. त्यानंतरही शासनाने न्याय द्यावा व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वेळोवेळी उपोषणे, आंदोलने करण्यात आली. मात्र या गंभीर प्रकाराकडे संबंधित
प्रशासनाने दुर्लक्ष केला आहे. लांजा नगरपंचायतीने घनकचरा प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जागेचा मोबदला जमीन मालकांना देऊन एक प्रकारे ग्रामस्थांच्या मागणीचा अपमान केला आहे. घनकचरा प्रकल्पासाठी घेण्यात आलेली जागा व प्रक्रिया पूर्णतः नियमबाह्य असून येथील ग्रामस्थांना उद्ध्वस्त करणारी आहे.

ग्रामस्थांच्या न्याय हक्कासाठी लांजा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने ग्रामस्थांना पाठिंबा दिला असून, ८ जुलै रोजी लांजा तहसील कार्यालयासमोर शिवसेनेतर्फे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण छेडण्यात येणार आहे. या नियमबाह्य पद्धतीने कोत्रेवाडी येथे होणाऱ्या घनकचरा प्रकल्प तातडीने रद्द करावा, अन्यथा लांजा तालुका शिवसेनेच्या वतीने यापुढे जोरदार आंदोलन केले जाईल.

याबाबत प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा अशी मागणी या निवेदनात केली आहे. निवेदन लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांना देण्यात आले. निवेदन देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख सुरेश करंबेळे, उपतालुकाप्रमुख युवराज हांदे, विभाग प्रमुख मंगेश जाधव, विभाग संघटक पंढरी गुरव, उपविभाग प्रमुख राजेंद्र सुर्वे, जितेंद्र कदम, उपविभाग संघटक धर्मेंद्र पालये यांसह कोत्रेवाडी ग्रामस्थ मंगेश आंबेकर, सतीश पेडणेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 PM 24/Jun/2025