Sanjay Raut, Hindi Language in Maharashtra Schools: राज्यात सध्या हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा गाजतोय. महायुती सरकारने शालेय विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकण्याची सक्ती केली होती. त्यावर मोठ्या प्रमाणावर टीकेची झोड उठली.
महाविकास आघाडीने हा मुद्दा चांगलाच लावून धरला. त्यानंतर रविवारी बोलताना, त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मात्र यावरही शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. तसेच, मराठी सेलिब्रिटी, अभिनेते, क्रिकेटपटू यांच्यावरही राऊतांनी सवाल उपस्थित केले.
“साहित्यिकांची मुले आणि नातवंडे इंग्रजी शाळेत शिकत आहेत. काहींची मुले तर परदेशात आणि इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल काही सांगू नका. बैठका घेण्याची काहीही गरज नाही. बैठकीचे गुऱ्हाळ चालू आहे हा मराठी भाषेचा अपमान आहे. हिंदी भाषेचा दबाव सुरू आहे, त्या विरोधात साहित्यिक, सेलिब्रिटी पेटून उठले असते. दक्षिणेत प्रकाश राज या विरोधात रोखठोक बोलत आहेत. पण इथे महाराष्ट्रात कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले, माधुरी दीक्षित? कुठे आहेत आमचे मराठी क्रिकेटपटू? मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या, तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचायचे, पण मराठीवर असे हल्ले होत असताना तुम्ही सर्वजण गप्प आहात,” अशा शब्दांत संजय राऊतांनी मराठी सेलिब्रिटींवर टीकास्त्र सोडले.
“साहित्यिकांच्या बाबतीत आम्हाला सांगू नका. आम्हाला माहिती आहेत की, ९०% पुरस्कार प्राप्त आणि लाभार्थी हे सरकारचे लाचार आहेत. या सर्व साहित्यिकांची मुले परदेशात शिकत आहेत किंवा शिकून आलेली आहेत. या मुलांना ना मराठीचा गंध आहे ना हिंदीची जाण आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपच्या सर्व नेत्यांची मुले विदेशी शाळांमध्ये शिकत आहेत. मी अभिमानाने सांगू शकतो की माझ्या मुली मराठी शाळेत शिकल्या. मला यावर बोलण्याचा अधिकार आहे. आमची मुलं मराठी शाळेत शिकले आहेत. किती भाजपावाल्यांची मुलं इंग्रजी शाळेत शिकत आहेत त्याच्या याद्या काढा. तुम्हालाही माझं म्हणणं समजेल,” असेही संजय राऊत रोखठोकपण म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 24-06-2025














