मंडणगडातील महसूल मंडळात वर्षातून चार वेळा शिबिर

मंडणगड : मंडणगड तहसील कार्यालयाच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडळात छत्रपती शिवाजी महाराज समाधान अशा स्वरूपाचे शिबिर घेण्यात येईल. हे शिबिर वर्षातून चार वेळा प्रत्येक मंडळनिहाय घेण्यात येणार असल्याचे महसूल विभागातर्फे घोषित करण्यात आले.

तहसील कार्यालयातर्फे मंडणगड पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभागृहात महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर पार पडले. यावेळी ही घोषणा करण्यात आली. या शिबिरात विविध दाखले, शिधापत्रिका, दिव्यांग दुचाकी यांचे वाटप करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात १४ प्रकारच्या विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत मौजे तिडे येथील आदिवासी वाडीतील बांधतांना प्राधान्य प्रवर्गातील शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. जिवंत सातबारा मोहिमेंतर्गत एकूण १,१२६ खातेदारांना सातबाराचे वाटप करण्यात आले आहे. तालुक्यात म्हाप्रळ, देव्हारे व वेसवी मंडळामध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. त्यातून तालुक्यातील २,०३४ ग्रामस्थांना शासकीय दाखले उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

या कार्यक्रमानिमित्त पंचायत समितीच्या सेस फंडातून एका दिव्यांग लाभार्थीला दुचाकी देण्यात आली. तसेच, नगरपंचायतीतर्फे माता रमाई आवास योजनेच्या २ लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला दापोली उपविभागीय अधिकारी विजयकुमार सूर्यवंशी, तहसीलदार अक्षय ढाकणे, नायब तहसीलदार संजय गुरव, मंडळ अधिकारी नीलेश गोडघासे, प्रकाश साळवी, गायकवाड, पुरवठा अधिकारी जाधव, ग्राम महसूल अधिकारी मयूर पंडित, उद्धव घाटूळ, आर. एस. मुल्ला, एच. बी. गटविकास अधिकारी विशाल जाधव, तालुका कृषी अधिकारी सोमनाथ अहिरकर, पोलिस निरीक्षक नितीन गवारे, नगर पंचायत मुख्याधिकारी अभिजित कुंभार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे, यांच्यासह सरपंच आणि मंडणगड मंडळातील २४ गावांतील लाभार्थी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:23 PM 24/Jun/2025