स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी सर्वांनी सज्ज व्हावे : मुझफ्फर मुकादम

मंडणगड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्याच्या निवडणुका असल्याने जनसामान्यांत संपर्क असणाऱ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी पक्ष काम करणार असल्याने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम यांनी केले.

मंडणगड तालुक्यातील भिंगळोली येथील श्रीकृष्ण सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते भाई पोस्टुरे, प्रकाश शिगवण, रमेश दळवी, फैरोज उकये, सुभाष सापटे, राकेश साळुंखे, वैभव कोकाटे, सतीष दिवेकर, अंजली बैकर, रेश्मा मर्चडे, नीलेश जाधव, हसरत खोपटकर, हेमंत सालदुरकर, भाई मालुगणकर, सुभाष शिगवण, दिनेश हुंबरे उपस्थित होते.

मुकादम पुढे म्हणाले की, कार्यकर्त्याच्या बळावर पक्ष मोठा होतो, सत्तेत जातो. त्यातून सर्वसामान्यांची विकासाची कामे केली जातात. त्यामुळे नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांनी विद्यमान राजकीय परिस्थितीचे आकलन करत कामाला लागावे. पक्ष महायुतीच्या माध्यमातून राज्यात सत्तेत आहे. त्या माध्यमातून तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सूचित केल्यानुसार विकासकामे गावागावात पोहोचवली आहेत. मात्र, प्रशासकीय यंत्रणा आपले अस्तित्व नाकारत असेल तर कार्यकर्त्यांनी उभे राहून आपले अस्तित्व दाखवून द्यावे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी ज्येष्ठ नेते प्रकाश शिगवण, रमेश दळवी, फैरोज उकये, सुभाष सापटे, भाई पोस्टुरे यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पक्षात नव्याने प्रवेश केलेल्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश साळुंखे यांनी केले.

जनतेत आपली ओळख अधिक पक्की करा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून अथवा स्वतंत्र याचा निर्णय आपले नेतृत्व घेईल. त्या निर्णयाचे स्वागत करून कामाला लागा. राजकारणात इतरांच्या अस्तित्वावर प्रश्न उभे करण्यापेक्षा जनतेत जाऊन आपली ओळख अधिक पक्की करा, असे आवाहन मुकादम यांनी यावेळी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:47 PM 24/Jun/2025