रत्नागिरी : नगर राजभाषा कार्यान्वयीन समितीच्या सर्व सदस्य कार्यालयांनी अंतर्गत कामकाजात हिंदीचा तर ग्राहकांसाठी स्थानिक भाषा मराठीचा वापर करावा. कार्यालयीन कामकाजात हिंदीचा वापर करून केंद्र सरकारचा उद्देश सफल करावा, असे समितीचे अध्यक्ष नरेंद्र देवरे यांनी सांगितले.
रत्नागिरी नगर राजभाषा कार्यान्वयीन समितीची अर्धवार्षिक बैठक आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलत होते. ही बैठक भारतीय तटरक्षक दलाच्या रत्नागिरीतील कार्यालयात झाली. ही या वर्षीची पहिली अर्धवार्षिक बैठक होती. या वेळी उपस्थित सर्वांचे रोप देऊन स्वागत करण्यात आले. ही समिती केंद्र सरकारी कार्यालय, बँक, विमा तसेच केंद्र सरकारअंतर्गत असणाऱ्या इतर कार्यालयांमध्ये हिंदी भाषेचा कार्यालयीन कामकाजात वापर व प्रसार करण्याच्यादृष्टीने भारत सरकार, गृहमंत्रालय, राजभाषा विभागाद्वारा गठित केली आहे. या समितीचे अध्यक्षपद तथा संचालन बँक ऑफ इंडियाच्या विभागीय कार्यालयाला सोपवले आहे. या वेळी समितीच्या प्रगतीचा वार्षिक आढावा समितीचे सदस्य सचिव रमेश गायकवाड यांनी घेतला. समितीने सामाजिक जबाबदारी म्हणून रक्तदान शिबिर व स्वच्छता अभियान, नेत्रचिकित्सा शिबिर तसेच वृक्षमित्र मंचची स्थापना करून वृक्षारोपण कार्यक्रम करणार आहे. सदस्य कार्यालयातील कर्मचारी सदस्यांच्या गुणवंत मुलांचा सन्मानचिह्न व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्याचबरोबर सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. ‘राजभाषा रत्नसिंधू’ या हिंदी पत्रिकेचे प्रकाशन या प्रसंगी करण्यात आले.
या बैठकीसाठी आलेले गृहमंत्रालयातील सहायक निदेशक प्रमोद सांगोले यांनी समितीच्या कार्याची पाहणी केली आणि त्यांनी समितीच्या कार्याबद्दल मार्गदर्शनही केले. समितीने दरवर्षीप्रमाणे विश्व हिंदी दिवस साजरा करून दीपस्तंभ आणि बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने हिंदी कवी संमेलनाचे आयोजन केले होते. या वेळी कोंकण रेल्वेच्या सहकार्याने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या वेळी भारतीय तटरक्षक अवस्थानचे समादेशक शैलेश गुप्ता, कमान अधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन मनोज कुमार बेहरा यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:53 24-06-2025














