रत्नागिरी : महाराष्ट्र फाउंडेशन, अमेरिका यांनी पुरस्कृत केलेल्या पंचम एकात्मिक ग्रामविकास प्रकल्पांतर्गत तालुक्यातील सत्कोंडी व कांबळेलावगण येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये ८ किलो वॅटचा सोलर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या दोन्ही शाळा जिल्ह्यातील पहिल्या सौर शाळा झाल्या आहेत. या शाळांवर तब्बल साडेपाच लाखांचे सौर पॅनल बसविण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही शाळांचे वीजबिल शून्य होणार असून, वर्षाला सुमारे दोन लाखांची बचत होणार आहे.
सत्कोंडीमधील स्व. अनंतराव बैकर बहुउद्देशीय संकुलातील प्राथमिक शाळा, ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय, ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय, अंगणवाडी, महिला उद्योग प्रशिक्षण केंद्र, व्यायामशाळा, वॉटर एटीएम या सर्व आस्थापनांना तसेच कांबळेलावगण येथील प्राथमिक शाळा, अंगणवाडी वॉटर एटीएम, बोअरवेल यांना सौरऊर्जा पुरवठा सुरू झाला आहे.
या प्रकल्पाकरिता लांजातील हेरिटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी समन्वय संस्था म्हणून काम करीत आहे. या दोन्ही सौर शाळांचे उद्घाटन महाराष्ट्र फाउंडेशनच्या संचालिका रेश्मा सांबरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला पंचम प्रकल्प समन्वयक दत्ता गुरव, सहायक प्रकल्प समन्वयक चेतन वाघ, हेरिटेजचे संस्थापक संतोष कांबळे, सत्कोंडीचे सरपंच सतीश थूल, उपसरपंच चंद्रकांत मालप, पंचमप्रमुख भाऊ काताळे, संजय बैकर, प्रकाश मालप, पी स्वेअर कंपनीचे वैभव छत्रे, अजय काताळे, प्रणाली मालप, समीक्षा घाटे, निकिता शिवगण, कवी अरुण मोर्ये, तंटामुक्त अध्यक्ष केशव बलेकर, पोलिस पाटील श्रीकांत खापले, संजय बलेकर, मुख्याध्यापक सुभाष पालये व सुशील वासावे, दोन्ही शाळांचे शिक्षक, गाव विकास समिती सदस्य उपस्थित होते.
वीज विकणार
सत्कोंडीमधील सोलर प्रकल्पामध्ये वर्षाला ७००० युनिट्स वीजनिर्मिती होणार आहे. तसेच कांबळेलावगण येथे वर्षाला ४५०० युनिट्स वीजनिर्मिती होणार आहे. या शाळा महावितरणला वीज विकत देणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:29 PM 24/Jun/2025














