मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील साहित्य आणि ग्रंथालयीन चळवळीत मोलाचे योगदान देणारे श्रीकांत पाटील यांना मुंबई येथील “कोकण दीप” मासिकाच्या वतीने “कोकण भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई मराठी संग्रहालयाच्या प्रा. सुरेंद्र गावस्कर सभागृहात आयोजित “कोकण दीप” च्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त, ना. श्री. योगेश कदम यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गेली २३ वर्षे विविध क्षेत्रांत उत्तम काम करणाऱ्या राज्यातील तीन हजार व्यक्तींना “कोकण दीप” मासिकाने सन्मानित केले आहे. “कोकण दीप” चे संपादक श्री. दिलीप शेडगे यांनी अनेक मान्यवरांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरवलेले आहे.
याच सोहळ्यात रत्नागिरी जिल्ह्यातील रवींद्र कालेकर, गजानन जोशी, श्याम सुंदर दळवी आणि सौ. रश्मी शिंदे यांचाही “कोकण भूषण” पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
श्रीकांत पाटील यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करणे आवश्यक आहे. त्यांनी १९९० पासून बसणी पंचक्रोशी ग्रंथालयाच्या अध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळून ग्रंथालयाला ‘ब’ वर्गापर्यंत पोहोचवले आहे. या प्रवासात त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या नाट्यस्पर्धेत संस्थेला सांघिक आणि वैयक्तिक अशी अनेक बक्षिसे मिळवून देण्यासाठी उत्तम नाटके सादर केली. ग्रंथालयाच्या नावावर अनेक प्रमाणपत्रे आणि रौप्य पदके जमा आहेत. विशेष म्हणजे, समाजसेवक बाबा दाते यांच्याकडून तीन गुंठे जागा मिळवून त्यांनी सर्वांच्या सहकार्याने ग्रंथालयाची देखणी इमारत पूर्णत्वास नेली आहे. तसेच, स्वरूपानंद ग्रंथालय, कुवारबाव परिसर हे ‘ब’ वर्गात आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. समर्थ रंगभूमीच्या माध्यमातूनही त्यांनी अनेक उपक्रम यशस्वी केले आहेत.
श्रीकांत पाटील यांना ‘कोकण भूषण’ पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वच स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:46 24-06-2025









