गुहागर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार कार्य क्षेत्रातीलच असावा : नीलेश सुर्वे

गुहागर : गुहागर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार हा विधानसभा क्षेत्रातीलच असावा. गुहागर विधानसभा मतदारसंघात पूर्ण गुहागर तालुका, चिपळूण तालुक्यातील ९२ मतदान केंद्रे आणि खेड तालुक्यातील ९० मतदान केंद्रे असे मिळून विधानसभा क्षेत्र तयार होते. या मतदार क्षेत्रातीलच महायुतीचा उमेदवार असावा, असे प्रतिपादन भाजपचे गुहागर तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी गुहागर येथे केले आहे.

२००९ पर्यंत या विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्त्व ही या गुहागर विधानसभा क्षेत्रातीलच होती. २००९ सालानंतर बदललेल्या रचनेनुसार या विधानसभा क्षेत्राबाहेरील काही नेतृत्वानी इथे नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला तर काही नेतृत्व आपले मतदानाचे केंद्र हे गुहागर विधानसभा क्षेत्रात आणि निवास मात्र शहरी भागात ठेऊन आहेत.

मागील १५ वर्षात विजयी आणि पराभूत उमेदवारांचे अनुभव लक्षात घेता गुहागर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे व्यक्तिमत्त्व हे या विधानसभा क्षेत्रातच अधिवास असणारे असावे म्हणजे या विधानसभा क्षेत्रातील ३२२ मतदान केंद्र, त्यामधील महसूल गावे, त्या अंतर्गत येणाऱ्या वाडी वस्त्या यांचा विकास, त्यांच्या मूलभूत गरजा, तेथील समस्या, उद्योग-व्यवसाय याची स्थानिक माणसाला चांगली जाण असते. दरम्यान, येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीकडून जे कोणी प्रतिनिधित्व या मतदारसंघात करणार असतील ते या विधानसभा क्षेत्रातीलच रहिवासी असले पाहिजेत, असे स्पष्ट मत गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे यांनी व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात काय घडते, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 15/Oct/2024