‘सितारे जमीन पर’ च्या विशेष प्रयोगातून रत्नागिरीत दिव्यांगांसाठी आशेचा किरण!

◼️ उद्योजक श्री. दीपक पवार आणि सौ. पूजा दीपक पवार यांचा एक हृदयस्पर्शी उपक्रम

रत्नागिरी : रत्नागिरीतील अविष्कार आणि आशादीप या संस्थांमधील १६० बौद्धिक विकलांग विद्यार्थ्यांसाठी मंगळवार, २४ जून २०२५ रोजी ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाच्या विशेष प्रयोगाचे आयोजन करण्यात आले. या हृदयस्पर्शी उपक्रमामागे रत्नागिरीचे उद्योजक श्री. दीपक पवार आणि सौ. पूजा दीपक पवार यांची प्रेरणा होती.

या कार्यक्रमाचे आयोजन रत्नागिरीचे लोकप्रिय आमदार, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, माननीय डॉ. उदय सामंत साहेब आणि राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष व सिंधुरत्न योजनेचे सदस्य, माननीय श्री. किरण (भैया) सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले, असे दीपक पवार यांनी सांगितले.

बौद्धिक विकलांग मुलांबद्दल समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे आणि त्यांचा दृष्टिकोन बदलणे अत्यंत आवश्यक आहे. सहानुभूती, प्रेम आणि समान संधी देऊन आपण त्यांना समाजात सन्मानाने जगण्यास मदत केली पाहिजे, याच उदात्त हेतूने पवार दाम्पत्याने या विशेष शोचे आयोजन केले होते.

या प्रसंगी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख शिल्पा सुर्वे, शहर प्रमुख बिपीन बंदरकर, शहर संघटक सौरभ मलुष्टे, पप्पूशेठ सुर्वे, अभी दुडे, शिवसैनिक, दोन्ही संस्थांचे शिक्षकवर्ग आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे बौद्धिक विकलांग मुलांबद्दल समाजात अधिक संवेदनशीलता आणि सहानभूती वाढण्यास नक्कीच मदत होईल अशी आशा आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 25-06-2025