चिपळूण : साफयिस्ट कंपनीला उत्पादन बंदचे आदेश

चिपळूण : कामथे हरेकरवाडी येथील नदीत रासायनिक पाणी सोडल्याप्रकरणी गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीमधील साफयिस्ट कंपनीला उत्पादन बंद करण्याचे तात्पुरते आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कोल्हापूर येथील प्रादेशिक अधिकारी निखिल घरत यांनी चिपळूण पोलिस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चिपळूणमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार, २४ तासांत उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी कामथे हरेकरवाडी येथील नदीत रासायनिक पाणी सोडण्यात आले होते. हे पाणी कोणत्या कंपनीचे आहे, ते स्पष्ट नव्हते. पोलिसांनी दोन टँकर पकडल्यानंतर ते कोणाच्या मालकीच आहेत आणि कोणत्या कंपनीतून आले आहे, याचा शोध घेतला असता ते गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीमधील साफयिस्ट कंपनीचे असल्याचे समोर आले.

चिपळूणमधील काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी पोलिसांसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. पोलिस आणि एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून त्याचा अहवाल कोल्हापूर येथील प्रादेशिक अधिकाऱ्यांना पाठवला. अहवालामध्ये कंपनीने औद्योगिक विकास महामंडळाच्या परवानगीशिवाय जास्त पाणी वापरले आहे. मंडळाच्या परवानगीशिवाय बॉयलर इंधन नमुना बदलला आहे.

बॉयलरला पुरवलेले बॅग फिल्टर कार्यरत आढळले नाही आणि ते खराब स्थितीत आढळले. कंपनीतून टँकरद्वारे सांडपाणी सोडल्यामुळे नैसर्गिक नाल्यात दूषित झाल्याबद्दल एसआरओ साताराकडून यापूर्वीही तक्रार प्राप्त झाली होती. यासंदर्भात एमपीसीबीने सूचना करूनही कंपनीने त्याचे पालन केले नाही.

कंपनीकडून वारंवार अशाच घटना घडवत आहेत आणि परिसरात प्रदूषणाची समस्या निर्माण करत आहे. या कृतीमुळे पर्यावरणाचे गंभीर नुकसान झाले आहे आणि म्हणूनच या प्रकरणात नैसर्गिक न्यायाची तत्त्वे लागू करता येत नाहीत. त्यामुळे उद्योगाची वैयक्तीक सुनावणी होत नाही. एमपीसीबीच्या सूचनांचे पालन न केल्यामुळे कंपनीला उत्पादन थांबण्याचे आदेश घरत यांनी दिले आहेत.

साफयिस्ट कंपनी मोठी आहे. शेकडो कामगार कंपनीवर अवलंबून आहेत. आम्ही कंपनीला काही सुधारणा करण्यास सांगितले आहे. एक चूक पुन्हा होणार नाही, याची काळजी कंपनीला घ्यावी लागेल नाहीतर कठोर कारवाई केली जाईल – श्रीपाद कुलकर्णी, क्षेत्रीय अधिकारी, चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 25/Jun/2025