नीरज चोप्रानं ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक

भारताचा गोल्डन बॉय आणि जगातील आघाडीचा भालाफेकपटू नीरज चोप्राची आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधील सोनेरी घोडदौड कायम आहे. नीरजने झेक प्रजासत्ताक येथे आयोजित करण्यात आलेल्या ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.

या स्पर्धेतील अंतिम फेरीत तिसऱ्या प्रयत्नामध्ये ८५.२९ मीटल लांब भालाफेक करत नीरजने अव्वलस्थानासह सुवर्णपदकावर नाव कोरले. तर दक्षिण आफ्रिकेच्या डोव्ह स्मिथ याने ८४.१२ मीटर भालाफेक करत दुसरे स्थान पटकावले. ग्रेनडाचा पीटर अँडरसन ८३.६३ मीटर भालाफेकीसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

नीरज चोप्रा ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच सहभागी झाला होता. अंतिम फेरीत नीरजने फाऊलसह सिुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८३.४५ मीटर अंतर गाठले. तर तिसऱ्या प्रयत्नात ८५.२९ मीटर भालाफेक करत नीरजने क्रमवारीत अव्वलस्थान पटकावले. त्यानंतर चौथ्या प्रयत्नात ८२.१७ मीटर आणि पाचव्या प्रयत्नात ८१.०१ मीटर एवढी भालाफेक त्याने केली. तर शेवटच्या प्रयत्नात त्याने फाऊल केला.

यंदाच्या वर्षात नीरज चोप्राची कामगिरी सातत्यपूर्ण होत असून, त्याने पॅरिस डायमंड लीगनंतर सलग दुसऱ्या स्पर्धेत विजय मिळवला आहे. दरम्यान, नीरज चोप्रा याने यावर्षी दोहा डायमंड लीगमध्ये विक्रमी कामगिरी करताना पहिल्यांदाच ९० मीटरचा टप्पा ओलांडला होता. या स्पर्धेत नीरजने ९०.२३ मीटर एवढी भालाफेक केली होती. मात्र या स्पर्धेत नीरजला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. तर जर्मनीच्या ज्युलियन वेबर याने ९१.०६ मीटर एवढी भालाफेक करत सुवर्णपदकावर कब्जा केला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 25-06-2025