रत्नागिरी : देवरूख पोलिस ठाण्याच्या संकल्पनेतून श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, योग प्रात्यक्षिके व आपत्कालीन प्रात्यक्षिके करण्यात आली.
मार्लेश्वर तीर्थक्षेत्री स्वच्छ ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. पर्यटकांनी, भाविकांनी स्वच्छता राखून परिसराचे पावित्र्य जपावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक महेश तोरस्कर यांनी केले. या सर्व मोहिमांमध्ये पोलिसांसमवेत राजू काकडे हेल्प ॲकॅडमी, रेनट्री संघटना, पोलिसपाटील संघटना, मार्लेश्वर देवस्थान, मारळ ग्रामपंचायत सहभागी झाली होती.
मार्लेश्वर कमान परिसरात कृषीतज्ज्ञ हेमंत तांबे व पोलिस निरीक्षक तोरस्कर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यासाठी आपल्या नर्सरीतील रोपे तांबे यांनी उपलब्ध करून दिली. देवरूखचे पोलिस निरीक्षक महेश तोरस्कर, सागर मुरूडकर यांनी योग प्रात्यक्षिके दाखवली. राजू काकडे हेल्प ॲकॅडमीच्या कार्यकर्त्यांनी आपत्कालीन परिस्थितीविषयक प्रात्यक्षिके सादर केली. युयुत्सु आर्ते यांनी संपूर्ण मोहिमेचा आढावा घेतला. मार्लेश्वर पायथ्यापासून मंदिरापर्यंत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी व्यापाऱ्यांनी चांगले सहकार्य केले. मारळ ग्रामपंचायतीने मोहिमेत सहभाग घेतला. देवस्थानतर्फे मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.यावेळी नारायण गुरव, विजय लिंगायत, रूपेश सावंत, ‘रेनट्री’चे किशोर राक्षे, ‘बार्टी’चे सुशील कांबळे यांच्यासह सर्व विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते. पोलिस निरीक्षक तोरस्कर यांनी वृक्ष लागवड आणि संवर्धन आवश्यक असल्याचे सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 25-06-2025














