रत्नागिरी : सागरकिनारे स्वच्छता उपक्रमात सहभागी व्हा : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह

रत्नागिरी : स्वच्छता ही सेवा २०२४ या अभियानाच्या निमित्ताने सागरकिनारे स्वच्छता हा उपक्रम जिल्ह्यात सर्वत्र राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत शनिवार, २१ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील सागर किनाऱ्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर सकाळी ६.३० वाजता स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे, नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एन. देवेंदर सिंह यांनी केले आहे.

स्वच्छता ही सेवा २०२४ या अभियानाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक झाली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर वर्ग, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यबिनायक मुळे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, स्वच्चता ही सेवा या अभियानामध्ये सर्व अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग असावा. यात स्थानिक नागरिकांनीदेखील सहभागी व्हावे, नगर परिषदेने स्वच्छता पथके तयार करावीत. तसेच कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयांची स्वच्छता करावी. यामध्ये शाळा, अंगणवाडी, बाजारपेठा, समुद्रकिनारे, महाविद्यालय इत्यादी परिसरांची स्वच्छता करावी, असे सांगितले. सर्वांनी मिळून हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन केले. या बैठकीला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.