रत्नागिरी, दि. २४ जून २०२५ : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज येथे मोबाईल गेमच्या अतिव्यसनामुळे आलेल्या नैराश्यातून एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. २४ जून २०२५ रोजी दुपारी १.०० वाजण्याच्या सुमारास ही घटना नाणीज येथे घडली असून, या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रविंद्र राजेंद्र बेंद्रे (वय १७, रा. नेवासा बूटूक, ता. नेवासा, जि. अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो गेल्या वीस दिवसांपासून नाणीज येथे त्याचे मामा विकास पोपट म्हसे यांच्याकडे कॉलेज शिक्षणासाठी आला होता.
विकास पोपट म्हसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्रला मोबाईलवर गेम खेळण्याचे व्यसन जडले होते. या व्यसनामुळे तो दिवसेंदिवस बेचैन आणि नैराश्यात जात होता. याच नैराश्यातून त्याने आपल्या राहत्या खोलीतील लोखंडी अँगलला टॉवेलने गळफास घेतला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्याला तात्काळ खाली उतरवून पाली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून रविंद्रला मृत घोषित केले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मोबाईल गेमच्या अतिव्यसनाचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत. ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यू क्रमांक ५०/२०२५ बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 25-06-2025














