रत्नागिरी : प्रतिपंढरपूर श्री विठ्ठल मंदिरात येणाऱ्या दिंडीचा सुवर्णमहोत्सव

रत्नागिरी : येथील बाजारपेठ भागात वसलेल्या आणि प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती पावलेल्या श्री विठ्ठल मंदिरात येणाऱ्या व विठ्ठलभक्त दाजीबा नाचणकर यांनी सुरू केलेल्या पायी दिंडीला यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्त मोठ्या प्रमाणावर दिंडीचे आयोजन करण्याचा निर्णय वारकऱ्यांनी घेतला आहे.

विठ्ठल मंदिरात दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला दिंडी येत असते. १९७५ पासून विठ्ठलभक्त नाचणकर यांनी पुढाकार घेऊन ही दिंडी भार्गवराम मंदिर येथून प्रतिपंढरपूर श्री विठ्ठल मंदिरात आणायला सुरवात केली. यावर्षी आषाढी एकादशीला या दिंडीला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. यंदा मोठ्या प्रमाणात ही दिंडी आयोजित करण्याचे वारकरी संप्रदायाकडून विठ्ठल मंदिर संस्थेकडे कळवण्यात आले. त्यानुसार श्री विठ्ठल मंदिर संस्थेच्यावतीने रत्नागिरीमधील विविध समाजातील पदाधिकारी आणि संस्थेचे पदाधिकारी यांची एकत्र बैठक मंदिरात पार पडली.

या बैठकीला वारकरी कोटकर बुवा, रवी गुरव, राजू नेरकर, संतोष नाचणकर, दाजीबा नाचणकर यांचे पणतू संजय पतंगे, पाडाळकर, अॅड. रत्नाकर हेगिष्टे, मोहन चंदरकर आदी विविध समाजाची मंडळी, श्री विठ्ठल मंदिर संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. वारकरी संप्रदायाकडून केलेल्या सूचनेनुसार लवकरच दुसरी आढावा बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

या आषाढी एकादशीला सकाळी परटवणे येथील श्री भार्गवराम मंदिर येथून प्रतिवर्षाप्रमाणे वाजतगाजत आणि सुशोभित चित्ररथातून, ज्ञानोवा माऊलींच्या पादुकांची पालखी घेऊन ही दिंडी विठ्ठल मंदिरामध्ये येणार आहे. या दिंडीमध्ये जास्तीत जास्त वारकरी बंधू भगिनी यांनी सहभागी व्हावे, त्याकरिता हे आवाहन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 25/Jun/2025