चिपळूण नगर परिषदेच्या बांधकाम विभागात लवकरच नगर अभियंता पदाची होणार नियुक्ती

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या बांधकाम विभागात येत्या काही दिवसांतच संवर्गातील नगर अभियंता पदाची नियुक्ती होणार असून, शासनाच्या भरती प्रक्रियेत नव्याने भरती झालेल्या अभियंत्याला चिपळूण न.प. मध्ये नगर अभियंता म्हणून काम करण्याची संधी व अनुभव मिळणार आहे. नगर अभियंता पदाबरोबरच आवश्यकतेनुसार एक ते दोन सहाय्यक अभियंता देखील संवर्गातून न.प. च्या बांधकाम विभागात येत्या आठ दिवसांत कार्यरत होणार आहेत. चिपळूण नगर परिषदेत महत्त्वाच्या विभागात गेली काही वर्षे आवश्यक असणारे विभागप्रमुख व
अभियंते ही पदे रिक्त आहेत.

काही प्रमुख अधिकारी व अभियंते केडरमध्ये गेल्याने शासकीय नियमानुसार त्यांच्या अन्य न.प.मध्ये बदली होत आहे. मात्र, चिपळूण नगर परिषदेत आवश्यक असणारे महत्त्वाचे अधिकारी आणि अभियंते यांची नियुक्ती रखडली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कायमस्वरुपी नगर अभियंता, सहाय्यक अभियंते (दोन ते तीन), पाणी विभाग अभियंता, विद्युत विभाग अभियंता आदी अभियंत्यांची प्रामुख्याने गरज आहे. तसेच अग्नीशमन विभागातील प्रमुख अधिकारी, वाहन विभाग प्रमुख अधिकारी अशी अन्य महत्त्वाचे पदे अनेक वर्षे प्रतीक्षेत आहेत.

मध्यंतरात चिपळूण न.प.तील महत्त्वाच्या विभागातील अधिकाऱ्यांसह अभियंत्यांच्या बदल्या झाल्या. दरम्यान, शहराची नवीन पाणी योजना कामाच्या शुभारंभाच्या प्रतीक्षेत आहे. हे काम उत्कृष्ट व चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी पाणीपुरवठा विभागात अभियंत्यांची गरज आहे. मात्र, ऐन योजनेच्या अंतिम टप्प्यात येथील अभियंत्यांची बदली झाली. त्यामुळे कामचलावू काम सुरू आहे. मात्र, दिलासा देणारी गोष्ट म्हणजे प्रभारी कामकाज सुरू असलेल्या बांधकाम विभागाला शासकीय संवर्गातून नव्याने नियुक्त झालेले दोन ते तीन अभियंते लवकरच चिपळूण न.प. मध्ये हजर होणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:00 PM 15/Oct/2024