खेडमध्ये ३ महिन्यांचे ६४ टक्के धान्य वितरित

खेड : पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीसह पुरजन्य-स्थितीच्या पार्श्वभूमीवर येथील तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नधान्य पुरवठा विभागाकडून तालुक्यात २१ जूनपर्यंत ६४ टक्के शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना तीन महिन्यांचे मोफत धान्य वितरीत करण्यात आल्याची माहिती येथील पुरवठा निरीक्षक अमोल देशमुख यांनी दिली. आपत्कालीन परिस्थितीत लाभार्थी मोफत. धान्यापासून वंचित राहू नयेत यासाठी पुरवठा विभागाने आवश्यक ती खबरदारी घेत जून, जुलै व ऑगस्ट महिन्यातील धान्य अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना जून महिन्यातच वितरीत करण्यास सुरूवात करण्यात येत आहे.

लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना शहरातील ५ व ग्रामीण भागातील १२५ रास्त धान्य दुकानांच्या माध्यमातून शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना धान्य वितरीत केले जात आहे. आतापर्यंत ६४ टक्के शिधापत्रिकाधारकांना तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी वितरीत करण्यात आले. उर्वरित लाभार्थ्यांना जून अखेरीस धान्य वितरीत करण्यात, येणार असल्याचे सांगण्यात आले. १९ रोजी आलेल्या पुरामुळे शहरातील पाच रास्तधान्य दुकानांतून धान्य वितरीत करताना व्यत्यय आला होता. या लाभार्थ्यांना धान्य वितरीत करण्याच्या दृष्टीने त्या त्या रास्तधान्य दुकानदारांना सूचना देण्यात आल्याचे पुरवठा निरीक्षक देशमुख यांनी सांगितले

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:30 PM 25/Jun/2025