राजापुरातील निसर्गरम्य धबधब्याचे पर्यटकांना आकर्षण

राजापूर : यावर्षी मे महिन्यापासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ठिकठिकाणी धबधबे जोमाने वाह लागले आहेत. शिवाय पर्यटकांना खुणावू लागले आहेत. राजापूर तालुक्यात चार-पाच ठिकाणी निसर्गरम्य धबधबे असून, अलिकडच्या काळात पर्यटकांचा ओढा वाढत आहे. यामध्ये शासनाच्या माध्यमातून चुनाकोळवण येथील सवतकडा धबधब्याचे सुशोभीकरणाचे काम मार्गी लागले आहे.

निसर्गाने राजापूर तालुक्याला भरभरून सौंदर्य दिले आहे. पावसाळी दिवसांत विविध ठिकाणच्या धबधब्यांच्या रुपात त्याचे दर्शन होत असते. तालुक्यात धोपेश्वर, सौंदळ, हर्डी, चुनाकोळवण व काजिर्दा या ठिकाणी निसर्गरम्य धबधबे आहेत. मागील काही दिवस जोरदार पाऊस पडत असल्याने सर्व धबधबे जोमाने वाहू लागले आहेत.

हर्डी धबधबा शहरापासून लगतच हर्डी येथील धबधबादेखील निसर्गरम्य परिसरात आहेत तेथेसुध्दा हौशी पर्यटक स्नानासाठी जात असतात चुनाकोळवण येथील सवतकदा हा धबधबा तर खूपच आकर्षक आहे. तो अत्यंत अवघड अशाठिकाणी असून उंचावरुन जरी दर्शन होत असले तरी खाली उतरुन जावे लागते. तेव्हा त्याची नजाकत पहायला मिळते. शासनाच्या पर्यटनाच्या माध्यमातून या धबधब्याचे सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. अनेक सुखसोयी याठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत.

धूतपापेश्वर धबधबा…
तालुक्यातील शंकराचे जागृत स्थान असलेल्या धुतपापेश्वर मंदिरानजीक वाहणाऱ्या मृडानी नदीचा मोठा प्रवाह खाली नदीपात्रात पडतो. ते दृश्य नयनरम्य असते. श्रावण महिन्यात दर सोमवारी मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक या धबधब्याखाली मनमुराद स्नानाचा लाभ घेतात. आजूबाजुच्या निसर्गसंपत्र परिसरामुळे या धबधब्याला पर्यटनासह आध्यात्मिक टच राहिला आहे.

सौंदळचा धबधबा
तालुक्याच्या मध्य-पूर्व परिसरात सौंदळ येथे बारेवाडीतील असलेल्या धबधब्याचे दूरवर असलेल्या ओणी अणुस्कुरा वा मार्गावरुन दर्शन होते. सौंदळमधून त्या चयधब्याकडे पायवाटेने जाताना जवळपास दहा ते पंधरा मिनिटे लागतात. उंचावरुन मोठ्या आवाजात खाली कोसळणारा पाण्याचा प्रपात आजुबाजूच्या शांततेचा भंग करत असती. आजुबाजुच्या झाडाझुडु‌पामधून सौंदळ धबधब्याचे दर्शन होते. इथे त्यामानाने पर्यटक कमी प्रमाणात येतात.

काजिर्डा धबधबा
तालुक्याच्या जामदारखोरे परिसरातील काजिर्डा गावातील धबधबा हा सर्वात मोठा आहे. काजिर्डा गावात प्रवेश केला की लांबून त्याचे दर्शन होते. आजुबाजुला डोंगरांसह हिरवीगार वनराई अशा निसर्गाच्या लाभलेल्या नजाकतेमध्ये एका बाजुला एखादे पांढरे शुभ्र वस्त्र शोभावे असे काजिर्डामधील धबधब्याचे दर्शन होते. विशेष म्हणजे हा धबधबा मार्च, एप्रिलपर्यंत प्रवाहीत असतो.

अगदी मे महिन्यातदेखील त्याचा क्षीण झालेला प्रवाह पहावयास मिळतो. या धबधब्याच्या पाण्यावर काजिर्डा परिसरातील जनता उन्हाळी पिके येते. लगतच वाहणाऱ्या जामदा नदीमध्ये त्याचा प्रवाह पुढे सरकतो. मात्र या धबधब्याकडे आताना पायपीट करावी लागते. तालुक्यातील हे महत्वाचे धबधबे असून पावसाळी पर्यटनाला चांगली संधी लाभली आहे. सर्वत्र सुरु असलेल्या पावसामुळे आता हे सर्व धबधचे वाहू लागले असून पर्यटकांना खुणावू लागले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:04 PM 25/Jun/2025