राजापूरच्या शेवडीवाडी खाडीत मच्छिमाराचा बुडून मृत्यू; मासेमारी करताना काळाचा घाला

राजापूर, दि. २४ जून २०२५ : राजापूर तालुक्यातील शेवडीवाडी येथील खाडीकिनारी मासेमारीसाठी गेलेल्या एका मच्छिमाराचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. २४ जून २०२५ रोजी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी नाटे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नवनाथ महादेव नाचणेकर (वय ३१, रा. अणसुरे, म्हैसासुरवाडी, ता. राजापूर) असे पाण्यात बुडून मृत पावलेल्या मच्छिमाराचे नाव आहे. नवनाथ नाचणेकर हे अणसुरे-म्हैसेसुरवाडी येथील समुद्र खाडीत मासेमारी करत होते. मासेमारी करून ते खाडीतून बाहेर येत असताना अचानक खाडीला भरती आली. पाण्याचा योग्य अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले.

नवनाथ पाण्यात दिसेनासे झाल्याने त्यांचा खाडीच्या पाण्यात शोध घेण्यात आला. २४ जून रोजी सकाळी १०.२८ वाजता नाटे पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता असल्याची नोंद (नापत्ता रजि. नं. ०६/२०२५) करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांकडून आणि स्थानिक नागरिकांकडून खाडीच्या पाण्यात त्यांचा शोध सुरू होता. अखेर, २४ जून रोजी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास नवनाथ यांचा मृतदेह शेवडीवाडी येथील खाडीकिनारी पाण्यात आढळून आला.

या घटनेमुळे अणसुरे आणि शेवडीवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. नाटे पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यू क्रमांक १९/२०२५ बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:09 25-06-2025