आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण; रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘संविधान हत्या दिवस’

रत्नागिरी : आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकशाहीच्या लढ्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पोस्टर्स प्रदर्शन आयोजित करून ‘संविधान हत्या दिवस’ आज (२५ जून) करण्यात आला. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान उद्देशिका प्रतिमेस जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह आणि सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अवर सचिव भाग्यश्री भाईडकर यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून आणिबाणी कालावधित लोकशाहीच्या लढ्यासंदर्भात कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत कळविले होते. यात पोस्टर्स प्रदर्शन, बंदीवास सोसावा लागलेल्या व्यक्तींचा गौरव सन्मान करण्याबाबत प्रामुख्याने उल्लेख होता.

त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात हा ‘संविधान हत्या दिवस’ कार्यक्रम झाला. समतादूत आशिष कांबळे यांनी यावेळी कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक करून माहिती दिली. समाज कल्याण सहायक आयुक्त श्री. घाटे यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना संविधान उद्देशिकेची प्रतिमा भेट दिली. यानंतर संविधान उद्देशिकेचे यावेळी सर्वांनी वाचन केले. आणीबाणीच्या काळात लढा देणाऱ्या दिवंगतांना यावेळी श्रध्दांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी रोहिणी रजपूत, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक विजया मोरे, गृहपाल दीपक जाधव, गृहपाल रवींद्र कुमठेकर, निरीक्षक अमोल पाटील, लिपिक संतोष खेडेकर आदींसह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:15 PM 25/Jun/2025