रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याच्या वतीने पटवर्धन हायस्कूलमध्ये अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम

रत्नागिरी : उद्या (२६ जून) असलेल्या अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याच्या वतीने पटवर्धन हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, रत्नागिरी येथे आज (२५ जून) जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास पोलिस उपनिरीक्षक श्रीमती शीतल पाटील, पोलिस हेडकॉन्स्टेबल पावसकर, महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल श्रीमती ढवळ, पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर व दहावीला शिकवणारे सर्व शिक्षक यांची उपस्थिती लाभली होती. अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, त्यापासून होणारे सामाजिक, मानसिक आणि शारीरिक नुकसान याबाबत विद्यार्थ्यांना जागृत करणे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

कार्यक्रमात शिक्षक अजित मुळीक यांनी प्रोजेक्टरच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना माहितीपूर्ण स्लाईड्स दाखवल्या. त्यावर श्रीमती शीतल पाटील यांनी अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, सोशल मीडियाचे गैरवापराचे धोके, सायबर गुन्हेगारी आणि वाहतुकीचे नियम यावर अत्यंत सखोल व प्रभावी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास दहावीच्या ११० विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:20 PM 25/Jun/2025