मथुरा (प्रतिनिधी): भगवान श्रीकृष्णाची पुण्यभूमी असलेल्या मथुरेमधील श्रीगोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी, श्री स्वामी सेवामार्गातर्फे २७ जूनपासून राष्ट्रहितासाठी आयोजित करण्यात आलेल्या भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या चैतन्यदायी आणि भव्य दिव्य सोहळ्यासाठी अखिल भारतातून समस्त सेवेकऱ्यांचे जथ्थेच्या जथ्थे भागवत नगरीत दाखल होत आहेत.
परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या पावन उपस्थितीत सेवेकऱ्यांना ही अतिउच्च सेवेची पर्वणी लाभणार आहे. भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने आणि अद्भुत लीलेने पावन झालेल्या या वातावरणात ‘राधे-राधे’चा जयघोष करीत हजारो सेवेकरी या अपूर्व सेवेत सहभागी होणार आहेत. गोवर्धन येथील श्री कार्ष्णि आश्रमाच्या विस्तीर्ण मैदानावरील भव्य मंडपात २७ जून ते ४ जुलै या काळात हा भागवत सप्ताह संपन्न होणार आहे. गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या काळात बहुविध उपक्रम आणि विशेष सेवा घेण्यात येणार आहेत.
भव्य मिरवणूक, विशेष सेवा आणि उपक्रम:
गुरुवार, २६ जून रोजी श्रीमद् भागवत ग्रंथाची महामिरवणूक काढण्यात येणार आहे.
२७ जून रोजी पितरांना सद्गती मिळण्यासाठी श्रीयमुना जलाने पितृतर्पण विधी होईल. त्यानंतर भागवत पारायणाचा प्रधान संकल्प होऊन पठणाला प्रारंभ होईल.
२८ जून रोजी असाध्य आजार, ग्रहपीडा आणि सर्वापत्ती निवारण्यासाठी श्रीनारायण कवच धारण विधी होईल.
२९ जून रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त सुयोग्य संतान प्राप्तीकारक श्री संतान गोपाळ मंत्रानुष्ठान व श्रीकृष्ण दोलोत्सव घेण्यात येणार आहे.
३० जून रोजी कन्या विवाहकारक श्रीकात्यायनी पूजन व मंत्रानुष्ठान तसेच धनधान्य समृद्धीकारक श्रीगिरीराज गोवर्धन पूजन व अन्नकोट हा उपक्रम संपन्न होईल.
१ जुलै रोजी विवाहकारक श्रीकृष्ण-रुक्मिणी कल्याणोत्सव, २ जुलै रोजी श्री गुरुकृपादायक श्री दत्तात्रय पूजन व मंत्रानुष्ठान, तर ३ जुलै रोजी वंश वृद्धीकारक श्री द्वादशाक्षर मंत्र पुरश्चरण ही सेवा घेण्यात येणार आहे.
४ जुलै रोजी सांगतेला विशेष सेवा:
भागवत सप्ताहाची सांगता ४ जुलै रोजी होत असून, या दिवशी श्री महाविष्णू याग, श्री चक्रराज श्रीयंत्र पूजन आणि श्री सत्यनारायण पूजन ही विशेष सेवा घेण्यात येणार आहे. ज्या भाविक, भक्त आणि सेवेकर्यांना सात दिवस पारायण करणे शक्य होणार नाही, त्यांनी ४ जुलै रोजी होणाऱ्या सांगतेच्या सेवेला आवर्जून उपस्थित राहून संपूर्ण सप्ताहाचे प्रासादिक आशीर्वाद प्राप्त करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:47 25-06-2025














