चिपळूणमधील हेमंत भोसले यांना सायकलिंगमध्ये ‘एसआर’ किताब

चिपळूण : जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रीच्या जोरावर कोणत्याही वयात यश मिळू शकते याची प्रचिती चिपळूणमधील हेमंत भोसले यांनी दिली आहे. वयाच्या ४९ व्या वर्षी त्यांनी सायकलिंगमध्ये तब्बल ६०० किलोमीटरची स्पर्धा निर्धारित वेळेपूर्वीच पूर्ण केली. याशिवाय अवघ्या दोन महिन्यांत १ हजार ५०० किमी अंतर पूर्ण करत सायकलिंग मधली ‘एसआर’ हा मानाचा किताब मिळवला आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सह्याद्री रेंडोनियर्सने आयोजित केलेली सायकलिंग मधील ही स्पर्धा बीआरएम या नावाने ओळखली जाते. स्पर्धेची सुरुवात सातारा जिल्ह्यातील पाटण येथून पुणे जिल्ह्यातील शिरवळ, लोणंद, नातपुते, माळशिरस मार्गे पंढरपूर आणि तेथून परत आल्या मार्गी परत अशी तब्बल ६०० किलोमीटर अंतराची होती. स्पर्धेत एकूण १२ जण सहभागी झाले होते. सलग ४० तास सायकल चालवून ही स्पर्धा पूर्ण करायची असते. यामध्ये स्पर्धकांचा कस लागतो. मात्र, अवघे पाच महिने सराव करून हेमंत भोसले यांनी ही स्पर्धा निर्धारित वेळेआधीच पूर्ण केली.

भोसले यांना चिपळूण सायकलिंग क्लबच्या मनोज भटवडेकर, अजित जोशी, श्रीकांत जोशी, वाघमारे, प्रशांत दाभोळकर, अंकुश जंगम यांचे मार्गदर्शन लाभले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:14 PM 15/Oct/2024