खेडमध्ये गुटख्याची मोठी वाहतूक पकडली; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकास अटक!

खेड, दि. २४ जून २०२५ : खेड शहरात गुटखा आणि पान मसाल्याची अवैध वाहतूक करणाऱ्या एकास स्थानिक पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. खेड रेल्वे स्टेशनकडून भोस्ते गावाकडे जाणाऱ्या सिमेंट रोडवर, २४ जून रोजी पहाटे १.१५ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे ५ लाख रुपये किमतीचा गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरलेले वाहन जप्त करण्यात आले असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात पोशि/११९९ तुषार रमेश झेंड यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अविनाश दादासाहेब पारेकर (वय २१, रा. बेवनुर, ता. जत, जि. सांगली) याला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी अविनाश पारेकर हा त्याच्या ताब्यातील अशोक लेलँड कंपनीच्या ‘बडा दोस्त’ चारचाकी वाहन (एम.एच. १० टी.डी. ६६७८) मधून खेड रेल्वे स्टेशनकडून भोस्ते गावाकडे जात असताना, त्याला पोलिसांनी अडवले.

तपासणी केली असता, त्याच्या गाडीमध्ये विक्रीसाठी आणलेले केसरयुक्त विमल पान मसालाचे एकूण १४ पोते आढळून आले. प्रत्येक पोत्यात २२ पाकिटे असून, एकूण ३०८ पाकिटे होती. या प्रतिबंधित अन्नपदार्थाची किंमत ६०,९८४ रुपये आहे. याशिवाय, गुटखा वाहतुकीसाठी वापरलेले ४,००,००० रुपये किमतीचे अशोक लेलँड कंपनीचे वाहनही जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत ४,६०,९८४ रुपये आहे.

या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६, नियम व नियमन २०११ चे विविध कलम (२६(२), २७, २३, २६(२) सहवाचन कलम ३० (२) (ठ्ठ) सहवाचन मा. अन्न सुरक्षा आयुक्त महाराष्ट्र राज्य अधिसुचनाक्रमांक असुमाअ/अधिसूचना-३६९/७ दिनांक १५/०७/२०२० सहवाचन Regulation no. 2.3.4 of food safety & standards (Prohibition and Restriction on sales) Regulations 2011 सहवाचन Regulation no. 3.1.7 of food safety & standards (Prohibition and Restriction on sales) Regulations 2011 शिक्षा कलम ५९ प्रमाणे) गुन्हा (गु.र.नं. १९६/२०२५) दाखल करण्यात आला आहे.

आरोपीने जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी लोकसेवकाने जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:54 25-06-2025