संगमेश्वर, दि. २४ जून २०२५ : संगमेश्वर तालुक्यातील बावनदी नजीकच्या देवरुखकडे जाणाऱ्या रस्त्यालगत उभ्या केलेल्या एका होंडा युनिकॉर्न (MH 08 AW 7501) दुचाकीची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना २४ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ४.३० ते ८ जून २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजेच्या दरम्यान घडली असून, या प्रकरणी २४ जून रोजी रात्री ८.१२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम सुनील शिवलकर (वय २९, रा. जाकीमिऱ्या, आलाचा पाटीलवाडी, ता. जि. रत्नागिरी) यांनी याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वडिलांच्या नावावर असलेली ५०,०००/- रुपये किमतीची ग्रे रंगाची होंडा युनिकॉर्न गाडी त्यांनी मित्र आयुष समीर सावंत याला देवरुख येथे जाण्यासाठी दिली होती. आयुष सावंत देवरुखहून परत येत असताना गाडीची चेन तुटल्याने, त्याने ती गाडी बावनदी नजीकच्या ‘खात’ यांच्या किराणा दुकानासमोर रस्त्याच्या कडेला उभी केली होती.
फिर्यादी शुभम शिवलकर हे देवरुखला जात असताना बावनदी येथे आले. त्यावेळी त्यांनी आपली गाडी पाहिली असता ती उभ्या केलेल्या ठिकाणी दिसली नाही. त्यांनी आजूबाजूच्या परिसरात गाडीचा शोध घेतला, परंतु ती आढळून आली नाही. त्यामुळे, अज्ञात चोरट्याने स्वतःच्या फायद्यासाठी आणि लबाडीच्या इराद्याने, फिर्यादीच्या संमतीशिवाय गाडी चोरून नेल्याची खात्री त्यांना पटली.
या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०३ (२) नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा (गु.र.नं. ८८/२०२५) दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:54 25-06-2025














