जैतापूर : राजापूर तालुक्यातील साखरीनाटे परिसरात एका शाळकरी मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना बुधवारी २५ जून रोजी वाजण्याच्या सुमारास घडली. साखरी-नाटे येथील हुना मास्तर रोडवर ही घटना घडली. मात्र नागरिकांच्या प्रसंगावधाने मुलगी बालंबाल बचावली आहे. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार मत्स्य व्यवसाय शिक्षण घेणारी एक विद्यार्थिनी शाळेत जात असताना, नाटे सडा पेठ भागातील लोहार दुकान ते अस्मिता पतपेढी या मार्गावर अचानक ९ ते १० भटक्या कुत्र्यांच्या टोळीने तिच्यावर झडप घातली.
कुत्र्यांनी तिला वेढा घालून चावा घेण्याचा प्रयत्न केला. या अचानक हत्त्यामुळे ती अत्यंत घाबरून धावत सुटली सुदैवाने, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अंगणवाडी सेविका श्रीमती बाणे यांनी प्रसंगावधान राखत आपल्या छत्रीचा उपयोग करत कुत्र्यांवर प्रहार केला. त्याच वेळी परिसरातील काही महिलांनी धाव घेत तिला तात्काळ मदत केली आणि तिची कुत्र्यांच्या तावडीतून सुरक्षित सुटका करण्यात आली.
ही घटना केवळ एका विद्यार्थिनीपुरती मर्यादित नसून, संपूर्ण परिसरातील शाळकरी मुले, वृद्ध नागरिक आणि सामान्य जनतेसाठी एक गंभीर इशारा आहे. सध्या साखरी-नाटे परिसरात भटक्या कुत्र्यांचे टोळके रस्त्यांवर बिनधास्त फिरत आहेत, त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
या पूर्वीही ग्रामपंचायत साखरी-नाटे यांच्याकडे नागरिकांनी अर्ज करून भटक्या कुत्र्यांच्या त्रासाची माहिती दिली होती, मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही असे सांगितले जात आहे परिणामी आज अशा धोकादायक घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.
गंभीर घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा, भविष्यातील दुर्घटनांना आळा घालण्यासाठी वेळेवर प्रभावी पावले उचलणे अधिक महत्त्वाचे आहे. स्थानिक प्रशासनाने खबरदारी म्हणून त्वरित उपाययोजना कराव्यात, ही ग्रामस्थांची ठाम मागणी आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:04 PM 25/Jun/2025














