देवरुख, दि. २५ जून २०२५ : संगमेश्वर तालुक्यातील मेढे तर्फे देवळे येथील काजळी नदीच्या पाण्यात बुडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २४ जून रोजी सायंकाळी ४.३० ते रात्री ८.१४ वाजण्याच्या दरम्यान घडली. महावितरण सबस्टेशनच्या मागील बाजूस, देवपट्टा येथे हा अपघात घडला.
दीपक अंकुश गोरुले (वय ३९, रा. तिवरे तर्फे देवळे, ता. संगमेश्वर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दीपक गोरुले हे सिमेंटच्या पुलाजवळील काजळी नदीवरील कॉजवेवरून चालत जात होते. त्यावेळी त्यांचा तोल गेला असावा किंवा पाण्याचा अंदाज न आल्याने ते कॉजवेवरून वाहणाऱ्या नदीच्या पाण्यात पडले आणि प्रवाहाबरोबर वाहत गेले.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. अखेर, त्यांना नदीच्या पाण्यात मृत अवस्थेत आढळून आले. २४ जून रोजी रात्री ११.३६ वाजता देवरुख पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू क्रमांक १५/२०२५ बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे करण्यात आली आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नदीकाठी आणि कॉजवेवरून जाताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. देवरुख पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:08 25-06-2025














