रत्नागिरीत पोलिसांची धडक कारवाई: ५३९ ग्रॅम गांजा जप्त, एकाला अटक!

रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी अभियानात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे.

२५ जून २०२५ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, मिशन कॅम्प ते गवळी वाडा रोडवर एका संशयित व्यक्तीवर त्यांची नजर पडली. पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या जहीर मेहमूद काझी (वय ४५, रा. गवळीवाडा, रत्नागिरी) याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

दोन पंचांसमक्ष केलेल्या चौकशीत जहीर काझी याच्या पिशवीत ५३९ ग्रॅम वजनाचा हिरवट-काळपट रंगाचा आणि उग्र वासाचा गांजासदृश अमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी १५,००० रुपये किमतीचा गांजा आणि इतर मुद्देमाल असा एकूण ६५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी जहीर काझी याला पुढील कारवाईसाठी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

ही यशस्वी कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक श्री. ओगले, पोलीस हवालदार श्री. शांताराम झोरे, श्री. बाळू पालकर, श्री. अमित कदम, श्री. योगेश नार्वेकर, श्री. योगेश शेट्ये आणि महिला पोलीस हवालदार श्रीमती. वैष्णवी यादव यांनी बजावली आहे. रत्नागिरी पोलिसांनी अमली पदार्थ तस्करांविरोधात सुरू केलेल्या या मोहिमेमुळे जिल्ह्यात सकारात्मक संदेश गेला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 26-06-2025