रत्नागिरी : तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत पाली हायस्कूलचा संघ विजयी

रत्नागिरी : शालेय तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत पालीच्या मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूलच्या मुलांनी १९ वर्षाखालील गटाचे अजिंक्यपद पटकावले. हा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेला आहे तसेच १७ वर्षाखालील मुलांच्या खो-खो संघाने उपविजेतेपद पटकावले.

रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत १९ वर्षाखालील गटात नाणीज कॉलेजचा पहिल्या फेरीत तर उपांत्य फेरीत फाटक कॉलेजचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीमध्ये गतविजेता अभ्यंकर-कुलकर्णी कॉलेजचा पराभव करून विजेतेपद पटकावले. चुरशीच्या झालेल्या सामन्यात पाली संघातील खेळाडूंनी चांगला खेळ केला तसेच १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने अंतिम फेरी गाठली होती. नाणीज हायस्कूलबरोबर झालेल्या अंतिम सामन्यात प्रशालेला पराभव पत्करावा लागला. तत्पूर्वी पहिल्या सामन्यात पालीच्या मुलांनी खेडशी तर दुसऱ्या सामन्यामध्ये जागुष्टे हायस्कूलचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. या स्पर्धेत १९ वर्षाखालील गटात उत्कृष्ट संरक्षक म्हणून विपुल शैलेश पर्वते तर शिवम गणपत ताम्हणकर याची अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. १७ वर्षाखालील गटात उत्कृष्ट आक्रमक म्हणून युवराज विश्वास पवार याची निवड झाली. २४ ऑक्टोबरला डेरवण येथील वालावलकर ट्रस्ट क्रीडानगरीत होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेमध्ये १९ वर्षाखालील मुलांचा संघ रत्नागिरी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. या मुलांना क्रीडाशिक्षक तुफील पटेल यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:34 15-10-2024