राजापूर पोलिसांची धडक कारवाई : लाखो रुपयांची गोवा बनावट दारू जप्त, एकाला अटक!

रत्नागिरी, २५ जून : रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मद्य वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी दिलेल्या सूचनांनुसार, राजापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

बुधवारी पहाटे १ ते ५ वाजेच्या दरम्यान, राजापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. अमित यादव यांच्या नेतृत्वाखालील पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ (MH-05-FB-4152) मधून गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक केली जात आहे.

या माहितीच्या आधारे, पोलिसांनी एस.टी. डेपो, राजापूर येथे नाकाबंदी केली आणि संशयित वाहन ताब्यात घेतले. वाहनाची तपासणी केली असता, त्यात १,५७,९२० रुपये किमतीचे गोवा बनावटीचे मद्य आढळून आले. पोलिसांनी हे मद्य आणि दारू वाहतुकीसाठी वापरलेली ५,००,००० रुपये किमतीची स्कॉर्पिओ गाडी असा एकूण ६,५७,९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी चालक चेतक भरत वाळवे (वय २९, रा. तिवरेडांबरे वाळवेवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, राजापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक श्री. मोबीन शेख, सहायक फौजदार श्री. करजवकर, महिला पोलीस हवालदार श्रीमती. चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल श्री. रेडेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल श्री. वारीक यांनी यशस्वीपणे पार पाडली. अवैध मद्य वाहतुकीविरोधात पोलिसांच्या या सक्रिय भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 26-06-2025