रत्नागिरी : अनियमित धान्य पुरवठामुळे ‘पोषण आहार’ अडचणीत

लांजा : शालेय विद्यार्थ्यांना आहारातून नियमित प्रथिने मिळण्याच्या दृष्टीने सरकार पोषण आहार यासारखा उपक्रम राबवत असताना दुसरीकडे गेली चार महिने झाले तरी अद्यापही जिल्ह्यातील काही शाळांना पोषण आहाराचे धान्यच मिळाले नाही. त्यामुळे काटकसर करून विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याची नामुष्की शिक्षकांवर आली आहे तर कधी शिक्षकांना स्वतः च्याही खिशाला आर्थिक भुर्दंड पडत आहे.

या योजनेंतर्गत पात्र शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. राज्यातील सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना सुरू आहे. सरकारच्या नियमानुसार शाळांमध्ये प्रतिदिनी वेगवेगळे पदार्थ (मेन्यू) कार्ड तयार करण्यात आली आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना आहार बनवून दिला जातो. भाज्यांचा पुलाव, मसालेभात, मटार पुलाव, मूगडाळ खिचडी, चवळी खिचडी, चणा पुलाव, सोयाबीन पुलाव, मसुरी पुलाव, अंडा पुलाव, मटकीची उसळ, गोड खिचडी, मूग शेवगा वरण भात, तांदळाची खीर, नाचणीचे सत्त्व, मोड आलेले कडधान्य यांचा समावेश आहे. शालेय पोषण आहार बनविण्याचे काम महिला बचत गटांच्या महिला तसेच सामाजिक महिला संस्था तर काही ठिकाणी महिला पालकवर्ग यांच्याकडून केले जाते.

दरम्यान जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शालेय पोषण आहार पुरवठा करण्यासाठी जिल्ह्यात दोन ठेकेदारांना ठेका दिला आहे. दक्षिण व उत्तर रत्नागिरी अशा विभागवारीने जिल्ह्यातील शाळांना हे ठेकेदार धान्य पुरवठा करण्याचे काम करत आहेत. मात्र जून महिन्यात शाळा सुरू झाल्यापासून शाळांना एकाच महिन्याचे धान्य मिळाले असल्याचे समजते. लांजा, राजापूर, रत्नागिरी संगमेश्वर या तालुक्यातील शाळांना गेली चार महिन्यांपासून पोषण आहाराचे धान्य मिळण्यासाठी वारंवार तालुका व जिल्हा पातळीवर मागणी करावी लागते आहे. मात्र मागणी करूनही संबंधित ठेकेदारांकडून अद्यापही शाळांना धान्य पुरवठा केला जात नसल्याने तीव्र नाराजी उमटली आहे.

दर महिन्याला धान्यपुरवठा करावा
पुढील काही दिवसात शाळांना दिवाळीची सुट्टी पडणार आहे. सुट्टी कालावधीत किंवा तत्पूर्वी न मिळालेल्या तीन महिन्यांचे धान्य शाळांना एकत्रित देण्यात आले तर धान्यसाठा सुट्टी कालावधीत सुरक्षित ठेवणार कसा, असाही प्रश्न शाळांना पडला आहे. त्यामुळे धान्य साठा हा शाळांना प्रत्येक महिन्यालाच वितरित होणे अपेक्षित आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:22 PM 15/Oct/2024