गणेशगुळे सरपंचाविरोधात अविश्वासाचा ठराव : मनमानी कारभाराचा ठपका, पावस परिसरात खळबळ

पावस, ता. २५ : रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच श्रावणी विक्रांत रांगणकर यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वासाचा ठराव दाखल केल्याने पावस परिसरात खळबळ उडाली आहे. सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असल्याचा मुख्य आक्षेप त्यांच्यावर घेण्यात आला आहे. पावस परिसरातील ही अशी पहिलीच घटना असल्याने सर्वांचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत श्रावणी रांगणकर थेट सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. त्यावेळी सातही जागांवर एकाच विचाराचे पॅनल निवडून आले होते. सरपंचपदी महिला असल्याने, सदस्यांच्या माध्यमातून गावची विकासकामे सर्वांच्या संमतीने करण्याचा ठराव त्यावेळी करण्यात आला होता.

मनमानी कारभाराचे आरोप
मात्र, कारभार करत असताना सदस्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची सदस्यांची प्रमुख तक्रार आहे. उपसरपंच प्रसाद तोडणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामसभेत सुद्धा सरपंच यांच्या पतीचा हस्तक्षेप वाढत असल्याने ग्रामस्थांनी याबाबत त्यांना समज दिली होती. त्यानंतर सर्व सदस्यांच्या एकमताने ग्रामपंचायतीचा कारभार हाकण्याचे ठरले होते, परंतु प्रत्यक्षात सदस्यांना कोणत्याही कामकाजामध्ये विश्वासात न घेता दोन वर्षे कारभार केला जात होता.

उपसरपंच प्रसाद तोडणकर यांनी स्पष्ट केले की, “गाव विकासासाठी एकमताने ग्रामपंचायतीत पॅनल निवडून आणले. सर्वांनी एकत्रितरीत्या समन्वयाने काम करण्याचे ठरले होते; मात्र प्रत्यक्षात सरपंच यांनी सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असल्यामुळे गावच्या विकासाला खीळ बसत असल्यामुळेच हा निर्णय सदस्यांनी एकमताने घेतला आहे.”

तहसीलदारांकडे ठराव दाखल
प्रसाद तोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे सरपंच श्रावणी रांगणकर यांच्या कारभाराविरोधात अविश्वासाचा ठराव दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी यावर प्रतिक्रिया दिली की, “गणेशगुळे सरपंचाविरोधात माझ्याकडे अविश्वास ठराव आला आहे. सदस्यांना विश्वासात घेत नाही, असे ठराव दाखल करणाऱ्यांचे मत आहे. यावर सोमवारी (ता. ३०) ग्रामपंचायतीत सुनावणी घेण्यात येणार आहे.”

या अविश्वासाच्या ठरावावर ३० जून रोजी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 26-06-2025