आमदार भास्कर जाधवांच्या ‘स्टेटस’ने राजकीय वर्तुळात खळबळ : पक्षनेतृत्वाला आत्मपरीक्षणाचा सल्ला?

चिपळूण, ता. २५ : गुहागरचे आमदार आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव यांनी सोशल मीडियावर ठेवलेल्या दोन स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या स्टेटसद्वारे त्यांनी पक्षनेतृत्वाला आत्मपरीक्षण करण्याचा आणि वेळ गेल्यानंतर किंमत करण्याला अर्थ नाही, असा सल्ला दिल्याचे मानले जात आहे. त्यांचा दुसरा सल्ला नेमका कोणासाठी आहे, याबाबत तर्कवितर्क काढले जात असल्याने त्याची चर्चा अधिकच वाढली आहे.

मागील काही दिवसांपासून भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. प्रसिद्धी माध्यमांसमोर ते आपली नाराजी नसल्याचे वारंवार सांगत असले तरी, त्यांच्या कृतीतून ती स्पष्टपणे दिसून येते. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पक्षातील नेत्यांच्या कार्यपद्धतीवर टीका करणे, तसेच आपल्याला पक्षात कसे डावलले जात आहे, हे कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करत आहेत. यामुळे त्यांची नाराजी अधिकच स्पष्ट होत आहे.

जाधवांचे चर्चेतील ‘स्टेटस’
आज त्यांनी व्हॉट्सॲपवर ठेवलेले दोन स्टेटस सध्या राजकीय क्षेत्रातील चर्चेचा विषय बनले आहेत:

पहिला स्टेटस: “पक्षातील नेते, कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहेत. घर रिकामे होत असताना ते कसे समजत नाही. सर्व काही एकत्र आहे तरी शून्यतेची भावना आहे. आजकाल नात्यांमध्ये एक प्रकारचा दिखावा केला जातो.”
दुसरा स्टेटस: “दिवा जळत असताना तुपाची गरज असते. तो विझल्यानंतर तूप ओतणे निरर्थक आहे. एखाद्याचे वेळेवर कौतुक करा, वेळ निघून गेल्यानंतर कौतुक करणे निरुपयोगाचे आहे.”

या दुसऱ्या स्टेटसवरून, पक्षाने वेळीच त्यांचा सन्मान केला तर ठाकरेंच्या पक्षाला चांगले दिवस येतील, असे त्यांना म्हणायचे आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भास्कर जाधव यांच्या या ‘स्टेटस’मुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले असून, यावर पक्षनेतृत्व काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 26-06-2025