रत्नागिरीतील बुद्ध विहाराच्या कामाचा मार्ग मोकळा: उच्च न्यायालयाने जनहित याचिका फेटाळली

रत्नागिरी, ता. २५: रत्नागिरी शहरातील उत्पादन शुल्क विभागाला लागून असलेल्या थिबा राजाकालीन बुद्ध मूर्तीच्या ठिकाणी होणाऱ्या बुद्ध विहाराला स्थगिती मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका काल, २४ जून रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने फेटाळून लावली. यामुळे बुद्ध विहाराच्या कामाचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती भीम युवा पॅंथरचे पदाधिकारी प्रीतम आयरे यांनी दिली.

प्रकल्पाची पार्श्वभूमी
रत्नागिरी शहरातील दारूबंदी व उत्पादन शुल्क कार्यालयाच्या लगत थिबा राजाकालीन बुद्ध मूर्ती आहे, ज्याच्याशी बौद्ध समाजाच्या भावना जोडलेल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यातील बौद्ध जनतेसाठी प्रार्थनास्थळ म्हणून बुद्ध विहार उभारण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पासाठी जिल्हा नगरोत्थान योजनेतून साडेआठ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले. आराखडा आणि अंदाजपत्रक तयार झाल्यानंतर २३ सप्टेंबर २०२४ रोजी तालुक्यातील बौद्ध जनतेच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात भूमिपूजन सोहळा पार पडला होता.

दाखल झालेली याचिका
या बुद्ध विहाराच्या कामाला विरोध करणाऱ्या समाजातील काही व्यक्तींनी रत्नागिरी पालिकेवर दबाव तंत्राचा वापर केला होता आणि बुद्ध विहाराच्या इमारतीचे बांधकाम होऊ नये यासाठी प्रयत्न करत होते. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून रत्नदीप कांबळे यांनी याबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

न्यायालयाचा निर्णय
या याचिकेची सुनावणी काल, २४ जून रोजी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नामदार अलोक आराध्य आणि नामदार संदीप मरणे यांच्यासमोर झाली. सुनावणीअंती न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे आता रत्नागिरीतील बुद्ध विहाराच्या कामाला कोणताही कायदेशीर अडथळा राहिलेला नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 26-06-2025