76 लाख वाढीव मतदानासंदर्भातील याचिका हायकोर्टाने फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट

मुंबई : विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ६:००नंतर मतदान झाल्यामुळे कोणत्या विजयी उमेदवाराला फायदा झाला, याचे ठोस पुरावे नसल्याने याचिकेत तथ्य नसल्याचे स्पष्ट करीत उच्च न्यायालयाने बुधवारी निवडणुकीचा निकाल रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली.

याचिकाकर्त्याने न्यायालयाचा एक दिवस वाया घालवला, त्याला दंड ठोठावणे आवश्यक होते, अशी टिप्पणीही खंडपीठाने केली.

या याचिकेत संध्याकाळी ६:०० वाजल्यानंतर सुमारे ७६ लाख मते बेकायदेशीररीत्या घुसवल्याचा आरोप करण्यात आला होता.

याचिकाकर्त्याने सर्व विजयी उमेदवारांना प्रतिवादी केले नाही. तसेच २०२४च्या लोकसभा निवडणुकीतही हाच पॅटर्न होता, तर त्यावेळी आक्षेप का घेतला नाही? असा प्रश्न न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला केला. मुंबईचे रहिवासी चेतन अहिरे यांनी ही याचिका दाखल केली होती.

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अहिरे यांच्यावतीने बाजू मांडली. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आणि ६:००नंतरच्या मतमोजणीतील अनियमितता असे मुख्य आक्षेप याचिकेत घेण्यात आले होते.

याचिकाकर्त्याने सर्व विजयी उमेदवारांना प्रतिवादी केले नाही. त्यामुळे ही याचिका दाखल करून घेऊ शकत नाही, हा निवडणूक आयोगाचा मुद्दा उच्च न्यायालयाने योग्य असल्याचे नमूद करीत याचिका फेटाळली.

न्यायालयाने उपस्थित केलेले मुद्दे

लोकसभा निवडणुकीतही हाच पॅटर्न होता त्यावेळी आक्षेप का घेतला नाही?

६:००नंतर मतदान केल्यामुळे कोणत्या विजयी उमेदवाराला फायदा झाला, याचे ठोस पुरावे नाहीत.
याचिकाकर्त्याने सर्व विजयी उमेदवारांना प्रतिवादी केले नाही.

याचिकाकर्त्याने न्यायालयाचा एक दिवस वाया घालवल्याने दंड ठोठावणे आवश्यक होते. मात्र, आम्ही तसे करणार नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 26-06-2025