चिपळूण : निसर्गातील बदलांमुळे शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे. तर दुसरीकडे सध्या शेतकऱ्यांना गरज असतानाही युरिया खताचा येथे तुटवडा भासत आहे. तरी कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळेत खताचा पुरवठा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांनी रत्नागिरी जिल्हा कृषी अधिक्षक डॉ. शिवकुमार सदाफुले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चिपळूण तालुक्यातील शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे युरिया खताचा पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. तालुक्यात खरीप हंगाम सन २०२५-२६ साठी शेतकऱ्यांकडून युरिया खताची १ हजार १०० मेट्रिक टनाची मागणी आहे. मात्र, अद्याप केवळ ६२२ मेट्रिक टनापर्यंत युरिया खताचा पुरवठा झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
चिपळूण तालुक्यात सर्वत्र शेती मशागतीच्या तसेच भातलावणीच्या कामे शेतकऱ्यांनी जोरदार सुरू केली आहेत. त्यामुळे तालुक्यातील सहकारी सोसायट्या खत विक्रेत्यांकडे पुरवठा करण्यात आलेल्या युरिया खताचे शेतकऱ्यांना वितरण करण्यात आले आहे.
मात्र, आता शेतकऱ्यांकडून भात लावणीसाठी युरिया खताची मागणी वाढलेली असताना खताचा साठा शिल्लक नाही, अशी माहिती मिळाली आहे. खत शिल्लक नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. आता लावणीची कामे सुरू आहेत. वेळेत खताचा पुरवठा न झाल्यास त्यांचा खोळंबा होऊन त्यांना नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार चिपळूण तालुक्यात युरिया खताचा पुरवठा तातडीने करावा, अशी मागणी प्रशांत यादव यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 AM 26/Jun/2025














