रत्नागिरी : डिजिटल युगात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारात पारदर्शकता यावी यासाठी केंद्र सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाने ‘मेरी पंचायत अॅप’ आणले आहे. या माध्यमातून ग्रामस्थांना आता आपल्या ग्रामपंचायतीचा कारभार कसा सुरू आहे, याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
केंद्र तसेच राज्य शासनाकडून ग्रामपंचायती अधिक बळकट करण्यावर भर दिला जात आहे. विकासात येणारे अडथळे दूर व्हावेत यासाठी थेट ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून दिला जात आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता असावी व आपल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत काय विकास सुरू आहे, कोणत्या योजना आल्या आहेत, शासनाकडून किती निधी मिळाला आदी माहिती उपलब्ध होणार आहे.
त्यासाठी केंद्र शासनाने मेरी पंचायत हे अॅप तयार केले आहे. स्थानिक पातळीवरील एखाद्या विकासकामाची सूचना फोटोसह सूचित करून प्रशासनाच्या निदर्शनास आणून देता येणार आहे. तसेच काही समस्यांचे फोटो अपलोड करून झालेल्या कामातील चुका किंवा त्या कामाचे कौतुक मांडता येईल. त्यासाठी ग्रामपंचायतीने केलेल्या कामाबाबत ग्रामस्थांना आपल्या अभिप्राय नोंदवता येणार आहे तसेच मेरी पंचायत अॅपच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचा आर्थिक बाबींचा संपूर्ण लेखाजोखा ग्रामस्थांसमोर येणार आहे. त्यामुळे आपल्या गावाशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन वेळ घालवावा लागणार नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:52 PM 26/Jun/2025













