वेंगुर्ला : वायंगणी-बागायतवाडी समुद्रकिनारी येथील सागर रक्षक मित्र सुहास तोरस्कर यांना आढळून आलेल्या संशयास्पद साडेचार फूट लांबीच्या सिलिंडरचा बॉम्ब शोधक व नाशक पथक सिंधुदुर्ग ओरोसच्या पथकाने पाहणी करून बॉम्ब सदृश्य वस्तू नसल्याची खात्री पटल्यावर तो निकामी केला.
भविष्यात सुरक्षिततेच्या कारणास्तव समुद्रकिनारी बॉम्ब सदृश्य बेवारस वस्तू आढळल्यास त्याची तत्काळ माहिती पोलिस ठाण्याला देण्याचे आवाहन केले.
वायंगणी-बागायतवाडी येथे समुद्राच्या लाटांनी समुद्रकिनारी आलेला संशयास्पद साडेचार फूट लांब सिलिंडर सदृश्य वस्तू सागर सुरक्षा रक्षक तथा कासव मित्र सुहास तोरस्कर यांना आढळून आली होती. त्यांनी तत्काळ वेंगुर्ला पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी ही घटना जिल्हा पोलिस विभागाला कळविल्यानंतर बुधवारी सकाळी बॉम्ब शोधक व नाशक पथक सिंधुदुर्ग ओरोस चे पथक वायंगणी येथे दाखल झाले.
त्यांनी पाहणी करून सिलिंडर हा बाॅम्ब नसल्याचे लक्षात आल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव तो सिलिंडर निकामी केला. तसेच सागर रक्षक सुहास तोरस्कर यांनी यापूर्वीही समुद्रकिनारी आढळून आलेल्या बेवारस वस्तूंची माहिती पोलिसांना दिली असून, त्यांच्या सतर्कतेचे बॉम्बशोधक पथकाने आभार मानले. यावेळी बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे अधिकारी साटम, भालचंद्र दाभोलकर, कुराडे आणि चालक जाधव, सागर मित्र रक्षक सुहास तोरस्कर, घनश्याम तोरस्कर, सूरज तोरस्कर आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 26-06-2025














