राजापूर : कोदवलीत सापडली एकपाषाणी शैव गुफा मंदिरे !

राजापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली येथील सायबाच्या धरणाजवळ नदीच्या बाजूला चार शैव गुफा मंदिरे सापडली आहेत. ही मंदिरे वाकाटक राजवटीच्या काळातील असल्याचा अंदाज काही इतिहासकारांनी वर्तवला आहे.

कोदवली येथील शिवाजी कुंभार व विनोद पवार यांना ही गुफा मंदिरे सापडली आहेत. ६ व्या शतकातील ही शैव गुफा मंदिरे जंगल झाडीने वेढलेली आहेत.

वाकाटक राजवट भारताच्या दक्षिण भागात तिसऱ्या शतकापासून सहाव्या शतकापर्यंत अस्तित्वात होती. विंद्यशक्ती हा राजा या वाकाटक साम्राज्याचा संस्थापक मानला जातो. वाकाटक साम्राज्यात एकशिळा मंदिरे व गुफा मंदिरे यांच्या वास्तुकलेला प्रोत्साहन दिले गेले हाेते. कोदवली येथे सापडलेली शैव पंथीय गुफा मंदिरे ही राजापूरच्या प्राचीनतेचे महत्त्व अधोरेखित करणारी आहेत. राजापूर बंदरातून कोदवली मार्गे गोड्या नदीच्या पश्चिम किनाऱ्यावरून या साम्राज्याचा राजमार्ग असल्याच्या त्या खुणा असल्याचा इतिहास अभ्यासकांचा अंदाज आहे.

कशा आहेत या गुफा ?

  • कोदवली धरणाच्या खालच्या बाजूला साधारण ५०० मीटरच्या अंतरावर ही गुफा मंदिरे आहेत. ती शैवपंथीय असल्याचे त्यांच्या रचनेवरून दिसते. या गुफांमधील एका एकपाषाणी मंदिराचे प्रवेशद्वार तीन फूट रुंद व पाच फूट उंच आहे. आतील भाग हा साधारण आठ फूट लांब व सहा फूट रुंद आहे, तर उर्वरीत तीन मंदिरे छोटी आहेत. येथील काही पाषाणांवर अर्धवट कोरलेली मंदिरेही आहेत.
  • प्रत्येक गुफा मंदिरात एक चौथरा असून, एका मुख्य व मोठ्या गुफा मंदिरातील या तीन फूट रुंद व चार फूट लांब असणाऱ्या त्या चौथऱ्याला वरून खालपर्यंत जाणारे एक छिद्र आहे. हा संपूर्ण गुफा मंदिर परिसर ‘लॅटराइट’ दगडाचा आहे. एका गुफा मंदिराची उंची साधारण तीन फूट आहे, तर आतील भाग तीन फूट लांब व दोन फूट रुंद आहे. तीन नंबरच्या गुफा मंदिराचा आतील भाग चार फूट लांब, तर तीन फूट रुंद आहे. सध्या हे एकपाषाणी गुफा मंदिर पाण्याने भरलेले आहे. चौथे एकपाषाणी गुफा मंदिर अर्धवट स्थितीत कोरलेले आहे.

शंकरेश्वर मंदिराजवळही मंदिर

कोदवली नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर असणाऱ्या शंकरेश्वराच्या मंदिरालगत अजून एकपाषाणी मंदिर आहे. त्यामध्ये शिवलिंग स्थापित आहे. हे एकपाषाणी मंदिरही वाकाटक राजवटीतील असल्याचे मानले जाते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 26-06-2025