लांजा : कर्करोग शिबिरात आढळले चार संशयित रूग्ण

वाटूळ : कर्करोग निदान व्हॅन तीन दिवस लांजा तालुक्यात आली होती. यावेळी एकूण ५८२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये चार संशयित रुग्णांची बायोप्सी करण्यात आली. कर्करोगाचे लवकर निदान होऊन लवकर उपचार होण्याच्या दृष्टीने जिल्हा आरोग्य विभागाने ही मोहीम हाती घेतली आहे.

लांजा ग्रामीण रुग्णालयात २९२, भांबेड प्राथमिक आरोग्य केंद्रात १४४, वाडिलिंबू आरोग्य केंद्रात १४६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. संशयित रुग्णांचे नमुने तपासणीकरिता पाठवण्यात आले असून, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील औषधोपचार सुरू करण्यात येणार आहेत, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी अंजली गोरे, आरोग्य सहाय्यक, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक व आशा सेविका तसेच वालावलकर हॉस्पिटल येथील तज्ज्ञांचे सहकार्य लाभले. जिल्हा शल्य चिकित्सक भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये, लांजा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक ज्ञानेश विटेकर व तालुका आरोग्य अधिकारी प्रशांतकुमार परगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:25 PM 26/Jun/2025