देवरुख : महाराष्ट्र राज्य पदवी प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा तालुका शाखा संगमेश्वरच्या वतीने इयत्ता पाचवी ते सातवीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ‘स्वच्छता समूहगीत’ गायन स्पर्धा २० रोजी देवरूख येथे आयोजित केली आहे.
समूह गायन स्पर्धा सकाळी १० वाजता छत्रपती संभाजी महाराज सभागृह पंचायत समिती देवरुख येथे ही स्पर्धा होणार आहे. समूहगीतामध्ये कमीत कमी ६ व जास्तीत जास्त १० मुला-मुलींचा सहभाग असावा. गीत सादरीकरणासाठी ४ ते ६ मिनिटे कालावधी असणार आहे.
स्पर्धेसाठी लागणारे आवश्यक ते वाद्य साहित्य संबंधी शाळेने उपलब्ध करायचे आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक १ हजार ५०० रुपये, द्वितीय क्रमांक १ हजार २०० रुपये, तृतीय क्रमांक १ हजार रुपये व उत्तेजनार्थ क्रमांकास ५०० रुपये व सहभागी सर्व शाळांना सन्मानचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.
स्पर्धेत प्रथम प्रवेश घेणाऱ्या १५ शाळांनाच सहभागी करून घेतले जाणार आहे. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ याच दिवशी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी ‘नवोदय विद्यार्थी’ आदर्श शिक्षक’ ‘आदर्श शाळा’ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यांचा सत्कार सोहळा कार्यक्रमात केला जाणार आहे.
या कार्यक्रमाला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भरत चौगले, सहा गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे, गट शिक्षणाधिकारी प्रदीप पाटील, देवरुन नगर पंचायतीची मुख्याधिकारी चेतन विसपुते, पोलीस निरीक्षक अतुल जाधव, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष सदानंद भागवत, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, जिल्हा कार्याध्यक्ष नरेश सावंत, जिल्हा सरचिटणीस दिपक माळी, संचालक संजय डांगे सर्व संघटना अध्यक्ष हे मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत.
हा संपूर्ण कार्यक्रम पदवीधर संघटना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पावसकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन सचिव लक्ष्मण झोरे व अध्यक्ष सुनील करंबेळे यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:36 PM 15/Oct/2024









