दापोली, ता. २६ जून : दापोली तालुक्यातील गोरीवलेवाडी, कोंढे येथे कुत्र्याने केलेल्या शौचावरून झालेल्या वादातून मारामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी दापोली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
पहिली तक्रार: रुपेश गावडे यांच्याकडून
दिनांक २४ जून २०२५ रोजी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास रुपेश वसंत गावडे (वय ३५, व्यवसाय-शेती, रा. गोरीवलेवाडी कोंढे) हे त्यांच्या घराची आणि परिसराची साफसफाई करत होते. त्याचवेळी आरोपी महादेव जान रेवाळे यांचा कुत्रा गावडे यांनी साफ केलेल्या जागेत शौचास बसला. हे पाहिल्यावर गावडे यांनी कुत्र्याला काठी फेकून मारले. यामुळे संतापलेल्या महादेव जान रेवाळे यांनी गावडे यांच्या घराशेजारील शेतातून त्यांना “तू माझ्या कुत्र्याला कशाला मारलेस?” असे विचारले.
यावर गावडे यांनी, “तुमचा कुत्रा रोज माझ्या घरासमोर शौचास बसतो, म्हणून मी त्याला मारले,” असे उत्तर दिले. या उत्तराने चिडलेल्या महादेव रेवाळे यांनी “तुझ्या घराजवळ जाणारा रस्ता तुझ्या बापाचा आहे का?” असे विचारले. गावडे यांनी “हा रस्ता माझाही नाही आणि तुमच्या बापाचाही नाही” असे म्हटल्यावर महादेव रेवाळे यांचा पारा चढला. त्यांनी गावडे यांच्याजवळ येऊन शिवीगाळ, दमदाटी करत झटापट केली आणि हाताच्या थापडाने मारहाण केली. तसेच, त्यांच्या हातातील सळीने गावडे यांच्या डाव्या हातावर दोन ठिकाणी मारून त्यांना दुखापत केली. गावडे यांची पत्नी ऋाजा रुपेश गावडे, शेजारी स्मिता जयवंत राजिवले आणि अनुराग जयवंत राजिवले हे सोडवण्यासाठी आले असता, त्यांनाही महादेव रेवाळे यांनी हाताने मारहाण करून धक्काबुक्की केली.
या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गु.र.नं. ११८/२०२५, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११५(२), ३५१(१), ३५२ आणि ३३१(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी तक्रार: महादेव रेवाळे यांच्याकडून
या घटनेनंतर महादेव जान रेवाळे (वय ५८, व्यवसाय-शेती, रा. गोरीवलेवाडी कोंढे) यांनीही दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, दिनांक २४ जून २०२५ रोजी रात्री ८.०० वाजण्याच्या सुमारास रुपेश वसंत गावडे यांच्या घरासमोर रस्त्यावर त्यांच्या कुत्र्याने शौच केल्याच्या कारणावरून रुपेश गावडे यांनी त्यांना डाव्या कानशिलात मारले. तसेच, हातातील बांबूच्या जाड काठीने डोक्याच्या डाव्या बाजूवर फटका मारून दुखापत केली.
यावेळी रुपेश गावडे यांच्यासोबत विठ्ठल बाबू राजिवले, जयवंत पांडुरंग राजिवले, अनुराग जयवंत राजिवले आणि दिलीप दशरथ करंजकर (सर्व रा. कोंढे, गोरीवलेवाडी) यांनीही मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केल्याचे महादेव रेवाळे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गु.र.नं. ११९/२०२५, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), १८९(२), १११(२), १९० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दोन्ही तक्रारींची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:22 26-06-2025














