परशुराम घाटात जेसीबीचा भीषण अपघात : चालक गंभीर जखमी, लाखोंचे नुकसान!

खेड, ता. २६ जून : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट समाप्त होणाऱ्या ठिकाणी, लोटे बाजूकडील हायवे ब्रिजवर एका जेसीबी टेलिस्कोपिक हँडलरचा भीषण अपघात झाला आहे. १४ जून २०२५ रोजी सायंकाळी ५.४० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातात जेसीबी चालक गंभीर जखमी झाला असून, वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या प्रकरणी सुबोध सखाराम चाळके (वय ३३, व्यवसाय-कॉन्ट्रॅक्टर, रा. पिरलोटे, दत्तवाडी, खेड) यांनी २५ जून रोजी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, कर्नाटक राज्यातील विजापूर येथील बासवान बागेवाडी येथील रहिवासी प्रकाश भिमाप्पा लमाणी (वय ३२) हे एम.एच.०८ ए.एक्स. ०४९९ क्रमांकाचे जेसीबी टेलिस्कोपिक हँडलर वाहन अत्यंत निष्काळजीपणे आणि बेजबाबदारपणे चालवत होते.

गाडीवरील नियंत्रण सुटल्याने जेसीबी रस्त्याच्या कठड्यावर आदळला, ज्यामुळे हा अपघात घडला. या अपघातात चालक प्रकाश लमाणी यांना गंभीर दुखापत झाली आहे. तसेच, जेसीबीचेही मोठे नुकसान झाले आहे. जेसीबीचे स्टेअरिंग, मेन बूम, मोठा टायर, दोन काचा आणि स्टेअरिंग रॉड खराब झाले असून, जेसीबीच्या पुढील बाजूचे पूर्ण नुकसान झाले आहे.

खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम २८१, १२५ (अ) आणि १२५ (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा अधिक तपास सुरू आहे. महामार्गावर अशा मोठ्या वाहनांच्या निष्काळजीपणामुळे होणाऱ्या अपघातांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:36 26-06-2025